कंपतीन कामगार कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप
बेकायदेशीरपणे कामगारांना काढून टाकल्याची धडक जनरल कामगार संघटनेची तक्रार
अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथील कायनेटिक इंजीनियरिंग कंपनी मध्ये कामगार कायद्यांचे उल्लंघन करून, बेकायदेशीरपणे कामगारांना कामावरून काढून टाकण्याचे प्रकार घडत असल्याची तक्रार धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, पोलीस अधीक्षक व सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आली आहे. कामगारांना कामगार कायद्याचे लाभ न देता, बेकायदेशीरपणे काढून टाकण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याच्या मागणी संघटनेने केली आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे जनरल सेक्रेटरी रावसाहेब काळे यांनी दिला आहे.
एमआयडीसी, निंबळक रोड येथील कायनेटिक इंजीनियरिंग कंपनीच्या युनिट दोनमध्ये 1948 मधील तरतुदीचे उल्लंघन करून कायद्याची मोडतोड करून कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकण्यात आले आहे. बबन शिंदे, शिवकुमार ठाकूर, रामकुमार आदी कामगारांना कामावरुन काढण्यात आले आहे.
संबंधित कंपनीत वीस पेक्षा जास्त कामगार असून, कॅन्टीन, प्रकाश योजना, वेल्डींग ऑईल टाकी यांची दाटीवाटी करुन मशीन बसविण्यात आल्या आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. कंपनीत अनाधिकृतपणे कामगारांची कंत्राटी पद्धती चालवली जाते. कामगारांना 12 तास ड्युटी देवून त्याचे लाभ मात्र त्यांना दिले जात नाही. कामगारांचे पगार बँकेत जमा न करता संबंधित ठेकेदार हा कामगारांचा पीएफ व कामगार विमेचा लाभ कामगारांना देत नाही. कामगारांच्या नोंदवही अद्यावत ठेवल्या जात नाही. सदर कारखात्यात आरोग्य व सुरक्षेचा अभाव आहे. कामगारांच्या पगारातून दोन ते तीन हजार रुपये सुपरवायझर कटिंग करून त्यांच्या हातात देतात. त्यांना ओळखपत्र नियुक्तीपत्र देत नसून, कामगारांचा अपघात झाल्यास कंपनी व ठेकेदार दोन्ही हात वर करून कामगारांना घरचा रस्ता दाखवत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
सदर प्रश्नी यापूर्वी सहाय्यक कामगार अधिकारी, उपसंचालक आरोग्य विभाग व औद्योगिक सुरक्षा अधिकारी दुर्लक्ष करीत असून, या कंपनीची तपासणी करुन पुर्ननिरीक्षण करावे, सर्व कामगार उत्पादन प्रक्रियेत काम करत असून, त्यांना कंत्राटी नेमणूक कायदा 1970 चा लाभ मिळण्याचीही मागणी संघटनेने केली आहे.
