परवानगी नसताना त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत भरविले जाते माध्यमिकचे वर्ग
शाळेवर कारवाई करण्याची रिपब्लिकन युवा सेनेची मागणी
नगर (प्रतिनिधी)- केडगाव, अंबिकानगर येथील सीबीएससी पॅटर्नच्या इंग्रजी माध्यम शाळेला प्राथमिक व माध्यमिकची मान्यता नसताना देखील विद्यार्थ्यांकडून आर्थिक लूट सुरु असल्याचा आरोप करुन रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने शाळेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हा संघटक मेहेर कांबळे यांनी याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी व मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी यांना दिले आहे.
केडगाव येथील अंबिकानगर मध्ये सीबीएससी पॅटर्नची इंग्रजी माध्यमची शाळा असून, त्याला फक्त पूर्व प्राथमिकची परवानगी आहे. सदर कॉलनीमध्ये स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने राहतात. अशा रहदारीच्या ठिकाणी बेकायदेशीर रित्या माध्यमिक वर्ग भरवले जातात. सदर शाळेच्या आवारात पुरुष कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेण्यात आलेले नाही. शाळा चालवणारे कुटुंब शाळेच्या परिसरात वास्तव्यास आहे. धुळीतच लहान मुलांना जेवणासाठी बसविले जाते आहे. सदर शाळेत तक्रार पेटी नाही, सखी सावित्री समितीचा फलक नाही, डीएड, बीएड पदवीधारक असलेले कुशल शिक्षक नाही, मुलांसाठी प्रशस्त मैदान नाही, स्वच्छतागृहाची कमतरता आदी अनेक त्रुटीचा समावेश असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
मुलांच्या आरोग्याशी व जीवनाशी खेळ सुरु आहे. माध्यमिक वर्गाला परवानगी नसता देखील विद्यार्थ्यांकडून फी वसुल करुन वर्ग भरविले जात आहे. सदर शाळेवर कठोर कारवाई करून शाळेची असलेली मान्यता रद्द करण्याची मागणी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट केडगावमध्ये सुरु आहे. त्या इंग्रजी शाळेला फक्त पूर्व प्राथमिकची मान्यता असून, पैसे लाटण्यासाठी इयत्ता दहावी पर्यंत वर्ग भरविले जात आहे. हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा गंभीर प्रकार आहे. तातडीने शिक्षण विभागाने संबंधीत शाळेवर कारवाई करावी. अन्यथा रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने शाळेला टाळे ठोकून आंदोलन केले जाणार. -मेहेर कांबळे (जिल्हा संघटक, रिपब्लिकन युवा सेना)