12 ऑगस्टला श्री साईबाबा पालखी मिरवणूकीचे आयोजन
नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील बँक कॉलनी साई बाबा मंदिर येथे साई सच्चरित्र ग्रंथ पारायणास प्रारंभ झाले आहे. या धार्मिक सोहळ्यास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्री व सौ राजू सातपुते यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करून साई सच्चरित्र ग्रंथ पारायणाचे प्रारंभ झाले.
साई बाबा मंदिराच्या बाराव्या वर्धापन दिन निमित्ताने विविध आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन हा एक महत्वाचा दिवस असून, या दिवशी मंदिराची स्थापना झाली होती. या पार्श्वभूमीवर धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
साई सच्चरित्र ग्रंथ पारायणात काकड आरती, दुग्धाभिषेक, महापूजा, यज्ञ, आणि कीर्तन या धार्मिक कार्यक्रमाचा समावेश आहे. तसेच मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. केडगाव परिसरात मंगळवार दि. 12 ऑगस्ट रोजी साईबाबांच्या पालखी व पादुकांची मिरवणूक काढली जाणार आहे. यामध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. 13 ऑगस्ट रोजी मध्याह्न आरती आमदार संग्राम जगताप यांच्या यांच्या हस्ते होणार आहे. सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन श्री साईबाबा फाउंडेशनचे अध्यक्ष अजित कातोरे यांनी केले आहे.