सातव्या वेतनाचा लाभ मिळण्यासाठी शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांची भेट घेणार -पवळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महापालिकेच्या कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्यासाठी प्रधान सचिवांना निवेदन पाठविण्यात आले आहे. या प्रश्नावर कास्ट्राईबच्या जिल्हा परिषद येथील कार्यालयात बैठक पार पडली. यामध्ये शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे यांनी दिली.
कास्ट्राईबच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पवळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन राज्यातील बहुतांश महापालिकेतील कर्मचारी यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू आहेत. मात्र अहमदनगर महापालिका यापासून वंचित राहिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रंगनाथ गावडे, वसंत थोरात, लक्ष्मण जगताप, मंजूर शेख, रामदास वखारे, कदम आदी उपस्थित होते.
अहमदनगर महापालिकेने शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे आस्थापना खर्चाची टक्केवारी कमी करून, उत्पन्न वाढीचे नियोजन केले आहे. तर आस्थापना खर्चाची टक्केवारी नियंत्रित कशी ठेवता येईल? त्याबाबत सविस्तर अहवाल सादर केला आहे. त्याबाबत महापालिकेने सविस्तर प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याची संपूर्ण प्रत प्रधान सचिवांना पाठविण्यात आली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश महापालिकेत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू आहेत. त्या धर्तीवर अहमदनगर महापालिकेने 4 मार्च 2024 रोजी सादर केलेल्या अहवाल नुसार सातवा वेतन आयोगाला मंजुरी मिळण्याची मागणी कास्ट्राईबच्या वतीने करण्यात आली आहे.