भिंगारच्या श्रीमती ॲबट हायस्कूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी
खासदार शंकरराव काळे परसबागेचे उद्घाटन; जयंतीच्या मिरवणुकीचे वेधले लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य अतिशय अतुलनीय असून, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. शिक्षणाने क्रांती घडविणारे ते थोर समाज सुधारक आहे. रयत शिक्षण संस्थेचे त्यांनी लावलेले छोटे रापाचे वटवृक्ष बहरले असल्याचे प्रतिपादन कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी केले.
भिंगार मधील श्रीमती ॲबट हायस्कूल मध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोरे बोलत होते. हा जयंती सोहळा विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात पार पडला. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य रितूदीदी ॲबट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष वसंत राठोड, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सर्जेराव मते, रामभाऊ गमे, राम पानमळकर, प्रमोद मुळे, स्नेहबंधचे उद्धव शिंदे, गोरख वामन, भिंगार हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही. कासार, गांगुर्डे मॅडम, उषा पांढरे, हबीब मणियार, लता धोंडे, विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद तोरणे, मुख्याध्यापक नारायण अनभूले, पर्यवेक्षक संपत मुठे आदी उपस्थित होते.

पुढे मोरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना तुमच्या परिस्थितीवरून तुमचे करिअर घडत नसून, ध्येय ठेऊन वाटचाल करण्याचा संदेश दिला. तर अवांतर वाचन, मैदानी खेळ आणि मोबाईलचा कमी वापर ही त्रिसूत्री वापरून करिअर घडविण्याचे आवाहन केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. प्रारंभी शाळेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या खासदार शंकरराव काळे परसबागेचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये प्राचार्य प्रमोद तोरणे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशाची व बोलक्या भिंती प्रकल्पाची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रस्त्याचे काम मार्गी लावल्याबद्दल विक्रांत मोरे, वसंत राठोड आणि रितू दीदी यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

रीतूदीदी ॲबट यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षणाचे महत्त्व सांगून, उच्च शिक्षणाने ध्येय साध्य करण्याचे सांगितले. कर्मवीर अण्णांचे कार्य पुढे घेऊन जाणे, हीच त्यांना आदरांजली ठरणार असल्याची भावना सर्जेराव मते यांनी व्यक्त केली. अण्णांनी ग्रामीण जनसमूहाला शिक्षण देऊन परिवर्तन आणलं, असं प्रतिपादन रामभाऊ गमे यांनी केले.
जयंती सोहळ्यानिमित्त भिंगार परिसरातून मिरवणुक काढण्यात आली होती. ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे लेझीम, झांज पथकाचा समावेश होता. त्याचबरोबर इतर पथकांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या कला-गुणांचे सादरीकरण केले. तसेच विद्यालयात चित्रकला, मेहंदी, रांगोळी आदी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीमध्ये वेगवेगळ्या महान व्यक्तीची वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी भिंगारकरांचे लक्ष वेधले.
जयंती कार्यक्रमात विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधव रेवगडे व क्रांती घायतडक यांनी केले. आभार मुख्याध्यापक नारायण अनभूले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.