संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते सातारा येथे होणार सन्मान
शाळेची गुणवत्ता व विद्यालयाचे पुनर्मूल्यांकन करून दिला जातो पुरस्कार
नगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयास संस्थेच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2024-25 चे सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या गौरवार्थ कर्मवीर पारितोषिक नुकतेच जाहीर झाले आहे.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथी निमित्ताने 9 मे रोजी संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते हे मानाचे पारितोषिक सातारा येथील कर्मवीर समाधी परिसरात होणाऱ्या कार्यक्रमात शाळेला सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेतील सर्वाधिक गुणवत्ता प्राप्त विद्यालयाचे पुनर्मूल्यांकन करून दिला जाणारा हा सर्वोच्च गुणवत्तेचा मानाचा पुरस्कार आहे.
सदर पारितोषिक मिळण्यामध्ये विद्यालयातील सर्व सेवक व विद्यार्थी यांचे योगदान आहे. विद्यालयात सर्व सेवकांना बरोबर घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने पूर्णपणे प्रयत्न केला जातो. या विद्यालयाच्या गुणवत्ता विकासाच्या वाढीसाठी संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. तसेच स्व. शंकरराव काळे यांचे या विद्यालयावर विशेष प्रेम होते. मागील कालखंडात त्यांचे विशेष योगदान या विद्यालयास मिळाल्याने विद्यालयास हे पारितोषिक प्राप्त झालेले आहे.
शाळेल पुरस्कार मिळाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा शाळा समितीचे अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेवराव पांडुळे, अर्जुनराव पोकळे, अभिषेक कळमकर, उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, अंबादास गारुडकर, विश्वासराव काळे, कैलासराव मोहिते, विष्णुपंत म्हस्के, श्यामराव व्यवहारे यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया काकडे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा मार्गदर्शक शिवाजी लंके, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी यांचे विशेष अभिनंदन करून कौतुक केले. विद्यालयास प्राप्त पुरस्कारामुळे सर्व शिक्षक व सेवक वर्गाचे अभिनंदन होत आहे.