मेणबत्त्या प्रज्वलीत करुन व पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना अभिवादन
भारत माता की जय…, शहीद जवान अमर रहे!… च्या घोषणांनी परिसर दणाणला
नगर (प्रतिनिधी)- देशभक्तीच्या गीतांनी प्रफुल्लीत झालेल्या वातवरणात शहरातील हुतात्मा स्मारकात शनिवारी (दि.26 जुलै) कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. भारत माता की जय…, वंदे मातरम…, शहीद जवान अमर रहे!… च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला. लायन्स क्लब ऑफ अहिल्यानगर, लिओ क्लब ऑफ अहिल्यानगर व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून व उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलीत करुन कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूर शेख, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. संजय असनानी, सचिव प्रशांत मुनोत, खजिनदार दिलीप कुलकर्णी, अरविंद पारगावकर, हरजितसिंह वधवा, धनंजय भंडारे, लिओ क्लबचे अध्यक्ष गुरनूर वधवा, हर्ष किथानी, जगज्योत बग्गा, जस्मित वधवा, डॉ. सिमरनकौर वधवा, तनिष जग्गी, पै. नाना डोंगरे, सुभाष रणदिवे, रघुनाथ वाघ आदी उपस्थित होते.
अरविंद पारगावकर म्हणाले की, नागरिक व युवकांनी मनात देशभक्ती प्रज्वलित ठेऊन जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. जवानांचा त्याग, समर्पण व बलिदान न विसरण्यासारखे आहे. नागरिकांनी मनात देशभक्ती प्रज्वलित ठेऊन देश कार्यात योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. डॉ. संजय असनानी यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून कारगिल विजय दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या कार्यक्रमातून जवानांप्रति कृतज्ञता व शहिदांना मानवंदना देऊन समाजात देशभक्ती जागृती होत असल्याचे स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत मन्सूर शेख यांनी केले.
हरजितसिंह वधवा यांनी पाकिस्तान या शत्रुराष्ट्रान मैत्री भेट सुरू असताना, भारतात सैन्य व अतिरेकी पाठविले. आपल्या देशातील सिमा भाग बळकाविण्यासाठी कारगिल युध्द सुरु झाले. भारतीय जवानांनी विजय मिळवून पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावले. या युध्दात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्याचा कारगिलचा इतिहास सांगितला. उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलीत करुन वीर जवानांना नमन केले. तर पाहुण्यांच्या हस्ते पुष्पचक्र हुतात्मा स्मारकावर अर्पण करुन कारगिल मधील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
कारगिल विजय दिवसमध्ये स्पेन मधील युवक-युवतीचा सहभाग
लायन्स क्लबच्या युथ एक्सचेंज उपक्रमातंर्गत स्पेन मधून अहिल्यानगर शहरात आलेल्या मारथा ब्रियोनिस व मॅन्युअल रॉड्रिक्स या युवकांनी हुतात्मा स्मारक येथे कारगिल मध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण केली.