मेणबत्त्या प्रज्वलीत करुन व पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना अभिवादन
भारत माता की जय…, शहीद जवान अमर रहे!… च्या घोषणांनी परिसर दणाणला
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभक्तीच्या गीतांनी प्रफुल्लीत झालेल्या वातवरणात शहरातील हुतात्मा स्मारकात शुक्रवारी (दि.26 जुलै) कारगिलचा रौप्य महोत्सवी विजय दिवस साजरा करण्यात आला. भारत माता की जय…, वंदे मातरम…, शहीद जवान अमर रहे!… च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला. लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, लिओ क्लब ऑफ अहमदनगर व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून व उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलीत करुन कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, लायन्स क्लबच्या अध्यक्षा डॉ. अनघा पारगावकर, सचिव डॉ. सिमरन वधवा, खजिनदार अंजली कुलकर्णी, लिओ क्लबच्या अध्यक्षा रिधिमा गुंदेचा, खजिनदारपदी हर्षवर्धन बोरुडे, दिशा तलवार, ओम भंडारी, विजय कुलकर्णी, डॉ. संजय असनानी, प्रशांत मुनोत, कमलेश भंडारी, पुरुषोत्तम झंवर, प्रणिता भंडारी, जालिंदर बोरुडे, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, किरण भंडारी, यशवंत तोडमल, जिजामाता कन्या निवासच्या संचालिका ज्योती मोकळ, डॉ. प्रिया मुनोत, अर्चना माणकेश्वर आदींसह लायन्स व लिओ क्लबचे सदस्य, रयतच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळा संचलित जिजामाता कन्या निवासच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात रिधिमा गुंदेचा म्हणाल्या की, नागरिक व युवकांनी मनात देशभक्ती प्रज्वलित ठेऊन जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. जवानांचा त्याग, समर्पण व बलिदान न विसरण्यासारखे आहे. नागरिक व युवकांनी मनात देशभक्ती प्रज्वलित ठेऊन देश कार्यात योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. पाहुण्यांचे स्वागत मन्सूर शेख यांनी केले. जालिंदर बोरुडे यांनी कारगिल विजय दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या कार्यक्रमातून जवानांप्रति कृतज्ञता व शहिदांना मानवंदना देऊन समाजात देशभक्ती जागृती होत असल्याचे स्पष्ट केले.

डॉ. अनघा पारगावकर म्हणाल्या की, पाकिस्तान या शत्रुराष्ट्रान मैत्री भेट सुरू असताना, भारतात सैन्य व अतिरेकी पाठविले. आपल्या देशातील सिमा भाग बळकाविण्यासाठी कारगिल युध्द सुरु झाले. भारतीय जवानांनी विजय मिळवून पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावले. या युध्दात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. सीमेवर जवान तैनात असल्यामुळेच आपण देशांमध्ये सण-उत्सव समारंभ सुरक्षित साजरे करीत आहोत, याची प्रत्येकाने जाणीव ठेवणे गरजेचे आहे. या जवानांप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी रक्षा बंधनला लायन्सच्या माध्यमातून राखी पाठवण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले.
जिजामाता कन्या निवास (वस्तीगृह) मधील साक्षी खरात, अर्चना गायकवाड व शांती मृधा या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केली.उपस्थितांसह विद्यार्थ्यांनी मेणबत्त्या प्रज्वलीत करुन वीर जवानांना नमन केले. तर पाहुण्यांच्या हस्ते पुष्पचक्र हुतात्मा स्मारकावर अर्पण करुन कारगिल मधील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरजितसिंह वधवा यांनी केले. आभार संतोष माणकेश्वर यांनी मानले.