संतोष कानडे यांचा पुस्तके भेट उपक्रम वाचन संस्कृती वृद्धिंगत करणारा -आमदार संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या पुस्तके भेट उपक्रम वाचन संस्कृती जोपासण्यासाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आमदार संग्राम जगताप व शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कानडे राबवित असलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील योगदानबद्दल आणि नुकतेच कानडे यांना छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार जगताप बोलत होते. यावेळी जेष्ठ साहित्यिक संजय कळमकर, रसिक ग्रुपचे जयंत येलुलकर, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सचिव सुनील गोसावी, आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी राजेंद्र दासरी, डॉ. किशोर धनवटे, सुभाष सोनवणे, ज्ञानदेव पांडुळे आदी उपस्थित होते.
विविध शाळा महाविद्यालयात व सार्वजनिक वाचनालय, शालेय विद्यार्थ्यांना वाचनासाठी मोफत पुस्तके भेट उपक्रम राबविला आहे. शालेय वयातच ग्रंथालयाशी मैत्री व्हावी प्रेरणादायी पुस्तक वाचनातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, नववाचकांना प्रेरणा मिळावी, पुस्तकांबद्दल जागृकता निर्माण होऊन वाचन चळवळ बळकट व्हावी आणि अवांतर वाचनास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने विविध शाळा महाविद्यालयच्या ग्रंथालये व सार्वजनिक ग्रंथालयांना त्याचबरोबर वाढदिवस, लग्न समारंभात सत्कार प्रसंगी पुस्तके भेट, विविध राष्ट्रपुरुषांच्या जयंती, संविधान दिन, राष्ट्रीय दिवस निमित्ताने पुस्तक भेट उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती संतोष कानडे यांनी दिली.