नगर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा; उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये भोयरे पठार (ता. नगर) येथील भाग्योदय विद्यालयाच्या 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या कबड्डी संघाने विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत नगर तालुक्यातील विविध शाळांच्या 40 सघांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये भाग्योदय विद्यालयाच्या मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
ही स्पर्धा भातोडी (ता. नगर) येथील राजमाता शिक्षण संस्था भातोडी संचलित नृसिंह विद्यालयात पार पडली. यावेळी क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, संस्थेचे पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
मुख्याध्यापक हबीब शेख यांनी मुलांच्या कबड्डी संघाने विजेतेपद पटकावून भोयरे पठार गावचे नाव उंचावले आहे. ही विद्यालयाच्या आणि गावच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संघातील खेळाडूंचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शाळेच्या कबड्डी संघाने मिळवलेल्या यशाबद्दल भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भानुदासजी कोतकर, संस्थेचे सचिव सचिन (आबा) कोतकर, संचालिका वैशालीताई कोतकर, रघुनाथजी लोंढे, विद्यालयाचे मुख्याध्यापक हबीब शेख, क्रीडा शिक्षक भरत लगड, शालेय शिक्षक संजय गोसावी, सतीश मुसळे, शिवाजी धस, रामदास साबळे, सुनीता दिघे, अशोक टकले, मनीषा वाठोळे, संदीप भवर, अरुण उरमुडे आदींसह ग्रामस्थांनी विजेत्या खेळाडूंचे व क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन केले.