ओम दंडवते व आरमान शेख यांची महाराष्ट्र राज्य बीच फुटबॉल संघ प्रशिक्षणासाठी रवाना
नगर (प्रतिनिधी)- नारायणपूर, छत्तीसगढ येथे 12 ते 27 मे दरम्यान होणाऱ्या 20 वर्षाखालील स्वामी विवेकानंद राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या फुटबॉल संघात अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघटनेचा खेळाडू जॉय पंकज शेळके यांची निवड झाली आहे. एप्रिल महिन्यात पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य फुटबॉल अजिंक्य स्पर्धेमधून राज्यभरातील 44 खेळाडूंची वेस्ट इंडिया फुटबॉल असोसिएशनद्वारे निवड करण्यात आली होती. या निवडक खेळाडूंची अंतिम निवड चाचणी व प्रशिक्षण 25 एप्रिल ते 5 मे दरम्यान मुंबई येथे पार पडले. या शिबिरातील 18 खेळाडूंची महाराष्ट्र संघासाठी निवड करण्यात आली आहे. जय शेळके अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनद्वारे आयोजित केलेला जिल्हा फुटबॉल लीग मध्ये फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच वरिष्ठ राज्य अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेमध्ये अहिल्यानगर जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
अलिबाग जिल्हा रायगड येथे बुधवार (दि.7 मे) पासून पार पाडणाऱ्या महाराष्ट्र राज्य बीच फुटबॉल संघ प्रशिक्षण शिबिर निवड चाचणीसाठी ओम साहेबराव दंडवते (कराळे क्लब हाऊस) व आरमान इकबाल शेख (गुलमोहर स्पोर्ट्स क्लब) यांची देखील निवड झाली आहे. दोन्ही खेळाडू स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. या निवड चाचणीसाठी दोघेही खेळाडू खेलो इंडिया बीच गेम 2025 मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. सर्व यशस्वी खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालीद सय्यद, अमरजीत सिंग शाही, जोगासिंग मिन्हास, सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव, राजू पाटोळे, विक्टर जोसेफ, खजिनदार रिशपालसिंग परमार यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.