पत्रकार संरक्षण कायद्यान्वये तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
नगर (प्रतिनिधी)- शहरात पत्रकाराला शिवीगाळ करून, धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण अधिनियम 2019 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार अन्सार राजू सय्यद यांच्या फिर्यादीवरून बाबासाहेब बलभीम सानप (रा. वसंत टेकडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्रकार अन्सार सय्यद यांच्या राज चेंबर्स येथे 9 ऑगस्ट रोजी दुपारी गणेश उरमुले (रा. केडगाव) भेटण्यासाठी आले होते. यावेळी उरमुले यांनी लघुशंका केल्याने बाबासाहेब सानप यांनी त्यांना टॉयलेट धुवून घेण्यास सांगितले. या कारणावरून सानप यांनी उरमुले यांना मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
या भांडणावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पत्रकार अन्सार सय्यद व त्यांच्या मुलासही सानप यांनी शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. पुढचा नंबर तुझाच आहे! अशा प्रकारची धमकी दिल्याचे सय्यद यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
या गंभीर प्रकारानंतर पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी याप्रकरणी लक्ष घालून कारवाईचे आदेश दिल्याने बुधवारी (दि.13 ऑगस्ट) रात्री उशीरा पत्रकार संरक्षण कायदा 2019 अंतर्गत तसेच भारतीय दंड विधानातील संबंधित कलमान्वये बाबासाहेब सानप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.