ग्रामस्थ, जय हिंद फाउंडेशन व आजी-माजी सैनिकांच्या वतीने औटी यांचा गौरवपूर्ण सन्मान
नगर (प्रतिनिधी)- भारतीय सैन्यदलात (एएससी) सुभेदार पदावर कार्यरत असलेले पारनेर तालुक्यातील जामगावचे हरेश बबनराव औटी नुकतेच सेवानिवृत्त झाले. सेवापुर्तीनिमित्त गावातून त्यांची मिरवणुक काढून जामगाव ग्रामस्थ, जय हिंद फाउंडेशन व आजी-माजी सैनिकांच्या वतीने त्यांचा गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला.
हरेश औटी यांनी तीस वर्षे भारतीय सैन्यदलाच्या माध्यमातून देश रक्षणाची सेवा केली. विविध पदावर कार्य करुन त्यांनी आपल्या उत्कृष्ट कार्याने सुभेदार पदापर्यंत मजल मारली. या गावातील सुपुत्राच्या कार्याचा मळगंगा माता मंदिरात सन्मान सोहळा रंगला होता. यावेळी जामगावचे ग्रामस्थ, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामगाव सैन्य दलातील आजी-माजी सैनिक सुनील कदम, संतोष तडके, सुरेंद्र खाडे, विलास बर्वे, दीपक क्षीरसागर, परेश औटी, शंकर बांगर, बाळू मुंजाळ, शिंदे मेजर, गिरीष केदार, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्यांनी कार्यक्रमास हजेरी लावून हरेश औटी यांच्या सैन्यदलातील कार्याचे सन्मान करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सैन्यदलात राहून औटी यांनी गावाचे नांव उंचावले असून, ते गावाचे भूषण असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.