केडगावात रंगला आनंद दिंडीचा धार्मिक सोहळा
जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त 7 दिवस रंगणार विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जैन श्रावक संघाच्या वतीने प.पू. आनंदऋषीजी महाराज यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त आनंद दिंडी धार्मिक वातावरणात उत्साहात पार पडली. या दिंडीत भगवान महावीर, विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम महाराज आदींसह विविध साधू-संतासह महापुरुषांच्या वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. यामध्ये समाजबांधवांसह महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दिंडीचे यजमान पद मिळालेल्या भूषणनगर येथील अतुल मेहेर यांच्या निवासस्थानापासून सदर दिंडीला प्रारंभ करण्यात आला. महावीर स्वामींचे जयघोष करत दिंडी सोहळा रंगला होता. यामध्ये जेएसएस गुरुकुल व पाठशाळेचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी यावेळी वेगवेगळे पथनाट्य सादर केले. या दिंडीने केडगाव परिसरात भक्तीमय वातावरण संचारले होते.
मंडळाच्या युवकांनी लेझीमचा डाव सादर केला. तर भाविकांनी देखील दिंडीत उत्साहात सहभाग नोंदवला. सदरची दिंडी ही भूषणनगर, लिंक रोड, रंगोली चौक, नगर-पुणे महामार्ग, अंबिकाबस स्टॉप, शाहूनगर रोड मार्गे जैन श्रावक भवन या ठिकाणी दिंडी पोहोचली. त्यावेळी आनंद गुरु पाठशाला, आनंद कन्या विद्यालय, गुरुदेव युवक मंच यांसह विद्यार्थ्यांसह महिलांनी धार्मिक गीतांवर नृत्य सादर केले.
चातुर्मासच्या पार्श्वभूमीवर महासतीजी प.पू. दिव्यदर्शनाजी आणि महासतीजी प.पू. पुनीतदर्शनाजी यांचे प्रवचन झाले. त्यांनी प्रवचनातून नागरिकांना धार्मिकता, अध्यात्म व जीवनाचा सरळ मार्ग विशद केला. गुरू महाराजांनी हा दिवस दान दिवस म्हणून मानण्यात आला असल्याचे स्पष्ट करुन भाविकांना दानपेटीचे वाटप केले.
या दिंडी सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष अतुल शिंगवी, उपाध्यक्ष मयूर चोरडिया, रुपेश गुगळे, सोहन बरमेचा, विपुल कांकरीया, ललित गुगळे, राहुल शेटीया, कुशल भंडारी, परेश बलदोटा, सम्राट बरमेचा, रोहन चंगेडिया, पियुष बाफना, दर्शन गांधी, कमलेश फिरोदिया, प्रितेश बाफना, महेंद्र बोरा, पारस शेटीया, अतुल मेहेर, सफल जैन, अक्षय सुराणा, महावीर बोरा, धीरज कटारिया, राहुल शिंगवी, आनंद कटारिया, सचिन पोखर्णा, अमित चोरडिया, भरत भंडारी, पवन मुथियान, कमलेश पोखर्णा, किरण सुराणा, गणेश भंडारी, किरण सुराणा, महावीर भंडारी, हर्षल भंडारी आदींसह श्री वर्धमान जैन श्रावक संघ गुरुदेव युवा मंच, गुरुदेव महिला मंडळ सर्व जैन बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अतुल शिंगवी म्हणाले की, 11 वर्षानंतर हा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात केडगाव मधील जैन श्रावक भवनात होत आहे. दरवर्षी हे भवन फक्त महावीर जयंतीला खुले व्हायचे. या वास्तुची फारच बिकट परिस्थिती निर्माण झाली होती, यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी 20 लाख रुपयाचा निधी देऊन या वास्तुला पुनर्वैभव प्राप्त करुन देण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे समाज कायम ऋणी राहील व जैन बांधवांच्या वतीने त्यांनी आभार मानले. तर आनंद जन्मोत्सव 7 दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. या वर्षी धार्मिक बोली लावून दिंडीचे यजमानपद अतुल मेहेर यांनी घेतले. या सोहळ्याच्या माध्यमातून सर्व समाज मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले.