छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमले, तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
विद्यार्थ्यांचा लेझीम, दांडपट्टा, तलवारबाजीसह महाराजांच्या जिवंत देखाव्यांनी वेधले लक्ष
नगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती उत्सवानिमित्त युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, अहिल्यानगर जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून बुधवारी (दि.19 फेब्रुवारी) जय छत्रपती शिवाजी, जय भारत पदयात्रा काढण्यात आली. यात जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शाळा, महाविद्यालयाचे सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.

जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही पदयात्रा सुरू झाली. प्रारंभी शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. याप्रसंगी यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, नगर तहसिलदार संजय शिंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, भाऊराव वीर, विशाल गर्जे, संतोष वाबळे, प्रियंका खिंडरे, रमेश जगताप, जिल्हा मराठा संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, सेक्रेटरी विश्वासराव आठरे, जयंत वाघ, डॉ विवेक भापकर, दीपलक्ष्मी म्हसे, बाळासाहेब सागडे, विजयकुमार पोकळे, क्रीडा संघटनेचे शैलेश गवळी, संजय साठे आदींसह शासनाच्या सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, जिल्हा क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

केंद्रीय युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यामंध्ये जय शिवाजी-जय भारत पदयात्रा काढण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जिल्हा क्रीडा कार्यालयाचा या पदयात्रेत सहभाग होता. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पदयात्रेत विद्यार्थ्यांचे लेझीम पथक व दांडपट्टा, तलवारबाजी प्रात्यक्षिके नागरिकांची आकर्षण ठरली. पोलीसांच्या बॅण्ड पथकाने महाराजांना सलामी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि विविध महापुरुषांच्या वेशभुषेतील विद्यार्थी, घोड्यावर स्वार शिवाजी महाराज व मावळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. वाहतुकीचे नियमन व पर्यावरण संवर्धणाचा विद्यार्थ्यांनी संदेश दिला. भगव्या ध्वजांनी सर्व परिसर व्यापला होता. घोड्यांच्या रथात शिवाजी महाराज आणि विविध जिवंत देखाव्यांनी या पदयात्रेची शोभा वाढवली. यामध्ये विविध क्रीडा प्रकारासह लेझीम, दांडपट्टा, तलवारबाजीचे धाडसी प्रात्यक्षिक देखील सादर करण्यात आले. जयंती कार्यक्रमात एलईडी स्क्रीनद्वारे जय शिवाजी जय भारत पदयात्रे बाबत जनजागृती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळीवाडा वेस, आशा टॉकीज, कापड बाजार, तेलिखुंट, चितळे रस्ता, चौपाटी कारंजामार्गे दिल्लीगेट ते रेसिडेन्सिअल हायस्कूल दरम्यान यात्रेचा समारोप झाला.