मैत्री दिनानिमित्त कोल्हारमध्ये वडफांदी लागवड
प्रत्येकाने वृक्षमैत्री करुन त्यांचे जतन करणे आवश्यक -शिवाजी पालवे
नगर (प्रतिनिधी)- प्राणवायू देणारे वृक्ष हेच खरे मित्र असल्याचा संदेश देत जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने मैत्री दिनाचे औचित्य साधून कोल्हार (ता. पाथर्डी) येथे वडाच्या फांद्यांची विशेष लागवड करण्यात आली. या पर्यावरणपूरक उपक्रमात गावातील नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
या उपक्रमात जय हिंदचे शिवाजी पालवे, मेजर शरद पालवे, सचिन पालवे, चंदू नेटके, रामा नेटके, आजिनाथ पालवे, भाऊ पालवे, आप्पा गर्जे, दत्तू जावळे, शुभम दहिफळे, शिवा पालवे, श्यामा पालवे यांच्यासह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजी पालवे म्हणाले की, आजच्या धावपळीच्या जीवनात मानवाने अनेक नातेसंबंध जोपासले, मात्र सर्वात महत्त्वाचे नाते म्हणजे वृक्षांसोबतचे. हे वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतात, जीवन देतात. त्यामुळे वृक्षच आपले खरे मित्र आहेत. प्रत्येक नागरिकाने वृक्षमैत्री करणे आणि त्यांचे जतन करणे आवश्यक आहे. जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून कोल्हार परिसरात आजपर्यंत सुमारे 1600 वडझाडांची लागवड करण्यात आली असून, त्याचे योग्य पद्धतीने संवर्धनही सुरू आहे. गर्भगिरी पर्वतरांगेतील विविध ठिकाणी ही वडांची झाडे आता बहरू लागली आहेत. त्यामुळे कोल्हार हे जिल्ह्यात सर्वाधिक वड असलेले गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
वडाच्या झाडाची फांदी जर योग्य प्रकारे लावली तर ती नव्याने मूळ धरून चांगले झाड तयार करते. यामुळे रोपांची गरज कमी होते आणि खर्चाची बचत होते. यावर्षी कोल्हारमध्ये सुमारे 50 वडफांद्यांची लागवड करण्यात आली आहे. योग्य संगोपन केल्यास पुढील काही वर्षांत हे सर्वच झाडे वडवृक्षात रूपांतरित होतील, असा विश्वास जय हिंदच्या वतीने व्यक्त करण्यात आला.