राजमाता जिजाऊंची सुवर्णतुला देखावा आणि तुला वाटप उपक्रम
गरजूंना धान्य, शैक्षणिक साहित्य, कपडे आणि किराणा किट वाटपाचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त राजमाता जिजाऊंची सुवर्णतुला हा देखावा सादर करण्यात आला आहे. या देखाव्यासोबतच मंडळाने तुला वाटप उपक्रम राबवत सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री गौरी कुलकर्णी व सहकलाकार सुखदा बोरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभी भाविकांना फळांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, निवेदक प्रसाद बेडेकर, सुहास कुलकर्णी, सचिव आनंद मुथा, उपाध्यक्ष राहुल सावदेकर, प्रकाश गांधी, अमित गांधी, अजित गांधी, सत्येन मुथा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत यांनी माहिती दिली की, गणेशोत्सवाच्या प्रत्येक दिवशी तुला-वाटपाच्या माध्यमातून फळे, धान्य, कपडे, शैक्षणिक साहित्य आणि किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे. यंदाचा गणेशोत्सव केवळ भक्तीचा नाही, तर सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचाही आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमातून रस्त्यावर विविध खेळणी विक्री करणाऱ्या कुटुंबीयांनाही किराणा किट दिले जाणार आहेत. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप होणार आहे.
शैलेश मुनोत यांनी पुढे सांगितले की, मंडळाच्या वतीने वर्षभर रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, अन्नदान आणि गोरगरिबांना आधार देणारे उपक्रम राबविले जातात. दर महिन्याला एक ना एक सामाजिक उपक्रम सुरु असते. यावर्षी गणेशोत्सवात सुवर्णतुला देखाव्यासह सामाजिक तुला-वाटप उपक्रम सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अभिनेत्री गौरी कुलकर्णी यांनी गणेशोत्सव हा भक्तीबरोबरच समाजकारणाला जोडणारा असावा, ही संकल्पना मंडळाने खऱ्या अर्थाने साकारली आहे. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल. तर सुखदा बोरकर यांनी नगरकरांच्या उत्साहाने आणि सामाजिक बांधिलकीने भारावून गेले आहे. हा गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाने खऱ्या अर्थाने लोकहितकारी ठरत असल्याची भावना व्यक्त केली.