विद्यार्थ्यांनी सादर केला नवरसचा बहारदार सांस्कृतिक सोहळा; छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास केला जीवंत
शाळेत विद्यार्थ्यांना एआय रोबोटिकचे धडे दिले जाणार -आनंद कटारिया
नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी (जे.एस.एस.) गुरुकुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सांस्कृतिक सोहळा सोनेवाडी, अरणगाव रोडवरील शाळेच्या नव्या वास्तूमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक शरद ठुबे, गुलाब कटारिया, अलका भळगट, शाळेचे संचालक आनंद कटारिया, प्राचार्या निकिता कटारिया यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात प्राचार्या निकिता कटारिया म्हणाल्या की, शाळेच्या नव्या इमारतीसह विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यांना दर्जेदार शिक्षण, संस्कार, आहार व व्यायामाचे प्रशिक्षण यावरही विशेष भर दिला जात आहे. योग, प्राणायाम आणि शिवकालीन खेळांमधून विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा प्रयत्न होत आहे. ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन महाराष्ट्राच्या इतिहासाचे शिक्षण प्रत्यक्ष अनुभवातून देण्याचे उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
संचालक आनंद कटारिया यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत सांगितले की, डांगे पॅटर्नच्या आधारे शाळेची वाटचाल सुरू असून, 25 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही शाळा आज 500 हून अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करत पुढील वर्षीपासून विद्यार्थ्यांना एआय व रोबोटिक्सचे शिक्षण देण्याची योजना असून, अद्ययावत कॉम्प्युटर लॅबच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. उद्योजक शरद ठुबे यांनी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचे व शालेय विविध उपक्रमाचे कौतुक केले.
नवरस या संकल्पनेवर आधारित विविध नृत्य, गीतांनी स्नेहसंमेलनात रंग भरला. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्याचे सादरीकरण केले. धार्मिक व मराठी गीतांमधून समहाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या दुष्परिणामांवर आधारित नाटिकेच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या पिढीच्या समस्यांकडे प्रभावीपणे लक्ष वेधले. विद्यार्थी अभ्यास सोडून पब्जी, इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉटसअप, यूट्यूब, फ्री फायर गेमच्या जगात अडकून स्वत:चे भवितव्य कसे उध्वस्त करतात? याची गंभीरता मांडण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील पराक्रमाचा इतिहास विद्यार्थ्यांनी जीवंत करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी मराठी व हिंदी गीतांवर बहारदार नृत्य सादर करत एकच धमाल केली.
स्टुडंट ऑफ द इयर म्हणून प्रियल उपाध्याय (इयत्ता 5 वी) व देव सत्रे (इयत्ता 4 थी) यांना सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या आहारासाठी वर्षभर प्रयत्न करणाऱ्या 40 महिला पालकांचाही गौरव करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा पाठक व हर्षा कार्ले यांनी केले. आभार अनुपमा तोरडमल व वैशाली देशमुख यांनी मानले.