• Sat. May 10th, 2025

नांदगाव हद्दीत त्या पोलीसांनी तडजोडीने वाळूच्या गाड्या सोडल्याचा आरोप

ByMirror

Oct 8, 2024

निवेदनाबरोबर तक्रारदारांनी केले व्हिडिओ सादर

वाळू हप्ता घेणाऱ्या त्या पोलीसांचे निलंबन करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- नांदगाव (ता. नगर) येथील के.के. रेंज लष्करी हद्दीतील कापरी नदीतून मोठ्या प्रमाणात सर्रास वाळू उपसा सुरु असून, पोलिसांच्या आशीर्वादाने वाळू तस्करांना अभय मिळत असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. अवैध वाळू उपसा करुन घेऊन जाणाऱ्या 6 वाळूच्या हायवा गाड्या एमआयडीसी येथील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी पकडून व नंतर त्यांच्याशी आर्थिक देवाणघेवाण करुन गाड्या सोडून दिल्याचे व्हिडिओ तक्रारदार राजू पवार, समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदनासह सादर केले. तर हप्ते घेणाऱ्या त्या पोलीस कर्मचारीवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा 21 ऑक्टोंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


के.के. रेंज या लष्करी भागातील कापरी नदीत मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध वाळू उपसाची अनेकवेळा तक्रार व उपोषण करुनही कारवाई करण्यात आलेली नाही. महसूल मंत्री यांनी काढलेल्या आदेशाची व नियमांची पायमल्ली करून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. वाळू तस्करांशी आर्थिक हितसंबंध जोपासून महसुल व पोलीस प्रशासन कारवाई करण्यास पुढे येत नाही. अवैध वाळू वाहतुकीपासून ढवळपुरी (ता. पारनेर) व नांदगाव शिंगवे (ता. नगर) येथील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सहा वाळू काढण्याच्या बोट सुरु असून, वीस ते पंचवीस हायवा टिप्पर वाळू घेऊन भरधाव वेगाने चालत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


नुकतेच एमआयडीसीचे पोलीस कर्मचारी दुचाकीवर येऊन ढवळपुरी ते जांभूळबंद रोड, कोंडीबाची वाडी हद्दीत वाळूने भरलेले सहा हायवा टिप्पर पकडण्यात आले होते. मात्र काही तासांनी तडजोड करून त्या सोडून देण्यात आले. या संदर्भातील व्हिडिओ तक्रारदारांनी घेतला असल्याचा दावा केला आहे. सदर व्हिडिओ शूटिंग मधील गाडीवर आलेल्या पोलीस कर्मचारी यांची चौकशी करून त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.


या अवैध वाळू उपसा थांबविण्यासाठी अनेकवेळा तक्रार करुनही कारवाई केली जात नाही. वाळू तस्करांकडून महसुल व पोलीसांना मलिदा मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. तर कापरी नदीमध्ये वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटी सुरू असून, त्याचा मासिक हप्ता 2 लाख प्रत्येकी बोट, जेसीबीला 1 लाख प्रत्येकी व हायवा डंपरला 60 हजार रुपये प्रत्येकी महिना हप्ता पोलीसांकडून गोला केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर सदरची वाहतुक ही ढवळपुरी व पारनेर तालुक्यातून होत असून, पारनेर पोलीसही मलिदा लाटत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

या प्रकरणाची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी व्हावी व वाळूच्या गाड्या अडवून हप्ते घेणाऱ्या पोलीस कर्मचारीवर कारवाई करुन त्याचे निलंबन करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *