• Sat. Jul 19th, 2025

शिक्षक बदलीतील प्रमाणपत्रांची त्रयस्थ समितीद्वारे चौकशी करा

ByMirror

Jul 17, 2025

जिल्हा रुग्णालय व त्या संबधित विभागांना तपासणीचे अधिकार देऊ नये

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेत दिलेले दिव्यांग, घटस्फोटीत, परित्यक्ता, मतिमंद व गंभीर आजार प्रमाणपत्र कागदपत्रे तपासणी जिल्हा रुग्णालय व त्या संबधित विभागांना न देता, त्रयस्थ समितीची नेमणूक नाशिक जिल्हा रुग्णालय येथून करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले असून, याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.


अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये प्राथमिक शिक्षकांनी स्वतःच्या हितासाठी सन 2021 मध्ये बनावट कर्णबधिर, मतिमंद बनावट प्रमाणपत्र दिलेले असून, हे प्रमाणपत्र देणारे जिल्हा रुग्णालय मध्ये रॅकेट होते. जिल्हा परिषदेने त्याच जिल्हा रुग्णालयाकडे तपासणी देऊ नये, ते प्रमाणपत्र तपासणीसाठी त्रयस्थ समिती नेमून नाशिक जिल्हा रुग्णालय किंवा आर्मी रुग्णालय पुणे यांच्याकडून तपासणी करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी सन 2022 मध्ये बदली प्रक्रियेत प्रमाणपत्राची तपासणी ससून रुग्णालय पुणे यांच्याकडून करण्यात येणार होती. त्याबाबत शिक्षकांनी स्वतःच्या बचावासाठी कोर्टात धाव घेतली. त्यानंतर त्या प्रमाणपत्र तपासणी अहवाल प्रलंबित आहे. काही महिला शिक्षकांनी घटस्फोटीत व परितक्त्या असल्याचे दाखवून शिक्षण विभागाची दिशाभूल केली आहे. त्यावर सर्व कागदपत्र तपासणी स्थळी पाहणी करण्यात यावी. घटस्फोट झाला तर त्याचा कोर्ट निकाल तपासण्यात यावा. त्रयस्थ समिती अहिल्यानगर जिल्हा परिषद अंतर्गत न नेमता दुसऱ्या विभागातून नेमून त्याची तपासणी करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.


काही प्राथमिक शिक्षकांनी संवर्ग बदली प्रक्रियेसाठी दिशाभूल करणारी प्रमाणपत्र दिलेली आहे. ते देखील त्रयस्थ समितीकडून तपासण्यात यावी. इतक्या मोठ्या प्रमाणात संवर्ग एक मध्ये दुर्धर आजार, पक्षाघात, कर्करोग, मेंदूचे विकार, थॅलेसमिया व दिव्यांग असलेले शिक्षक म्हणजे विशेष आहे. अशा बनावट प्रमाणपत्र देऊन शासनाची दिशाभूल करून खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय केला जात आहे.

जिल्ह्यातील सर्व शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई 15 जून 2025 चे शासन परिपत्रक स वर्गची पायमल्ली मोठ्या प्रमाणात केली गेली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेत दिलेले दिव्यांग, घटस्फोटीत, परित्यक्ता, मतिमंद व गंभीर आजार प्रमाणपत्र कागदपत्रे तपासणी जिल्हा रुग्णालय व त्या संबधित विभागांना न देता, त्रयस्थ समितीची नेमणूक नाशिक जिल्हा रुग्णालय येथून करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *