बोल्हेगाव येथे जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत युवकांचे रोजगार व महिलांच्या सुरक्षेवर चर्चा
शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधा नाहीत आणि खासगी रुग्णालयांमध्ये होणारी पिळवणूक चिंताजनक -संदीप (नाना) कापडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक बोल्हेगाव येथील संस्थेच्या कार्यालयात पार पडली. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, तसेच खासगी रुग्णालयांमध्ये होणारी रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीस राज्याध्यक्ष रविराज साबळे, राज्य उपाध्यक्ष शरद शेट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप (नाना) कापडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष पंकज लोखंडे यांनी या बैठकीचे नियोजन केले होते. बैठकीदरम्यान शासकीय रुग्णालयांमधील अपुऱ्या सोयी-सुविधांचा मुद्दा गंभीरपणे उपस्थित करण्यात आला. रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात होणाऱ्या अडचणींबाबत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच, खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून जादा शुल्क वसूल केले जात असल्याबाबत चर्चा होऊन, अशा घटनांवर कठोर कारवाईसाठी प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. संघाने ठरविले की, शासकीय हॉस्पिटलमधील सुविधा सुधारण्यासाठी आरोग्य विभागाशी सतत पाठपुरावा करण्यात येईल.
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप (नाना) कापडे म्हणाले की, मानवाधिकार ही केवळ कायदेशीर संकल्पना नसून ती प्रत्येक माणसाचा श्वास आहे. आज सामान्य नागरिकाला आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि न्याय या मूलभूत गरजा सहज मिळाल्या पाहिजेत. शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधा उपलब्ध नाहीत आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची उघडपणे पिळवणूक होते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. यासाठी मानवाधिकार संघ म्हणून प्रत्येक पीडित नागरिकाच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळे यांनी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन केले.कार्याध्यक्ष अनिल गायकवाड, सचिव शरद महापुरे व हबीब शेख यांनी एमआयडीसी क्षेत्रातील विविध कंपन्यांमधील नवीन भरती प्रक्रियेवर सविस्तर चर्चा केली.
शहराध्यक्ष सविता हराळ यांनी महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या माध्यमातून महिलांना न्याय आणि संरक्षण मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला. उपाध्यक्ष ज्योती वाघ यांनी महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. जिल्हाध्यक्ष पंकज लोखंडे यांनी सांगितले की, तालुकास्तरावर बैठकींचे आयोजन करून स्थानिक स्तरावरील प्रश्न तत्काळ सोडवण्या संदर्भात नियोजन केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. कार्याध्यक्ष अनिल गायकवाड व संतोष वाघ यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर दीपक कांबळे यांनी आभार मानले.