अर्जदाराच्या खात्यावर विम्याची रक्कम अदा
ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे व्याजासह संपूर्ण रक्कमेचा दावा दाखल
नगर (प्रतिनिधी)- कायदेशीर नोटीस मिळताच स्टार हेल्थ ॲण्ड अलाईड इन्शुरन्स कंपनीने थेट ग्राहकाच्या खात्यावर 3 लाख 30 हजार रुपये जमा करत आरोग्य विमा क्लेमाची रक्कम अदा केली. मात्र कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासासाठी आता अर्जदाराने ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे व्याजासह संपूर्ण रक्कम मिळावी, यासाठी दावा दाखल केला आहे.
सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, अर्जदाराने जुलै 2020 मध्ये स्टार हेल्थ ॲण्ड अलाईड इन्शुरन्स कंपनीकडून स्वत: व कुटुंबियांसाठी 5 लाख रुपयांचा फॅमिली हेल्थ ऑप्टीमा इन्शुरन्स घेतला होता. सदर पॉलिसीचा कालावधी 1 जुलै 2024 ते 30 जून 2025 पर्यंत होता. अर्जदाराने यापूर्वी कोणताही विमा घेतलेला नसल्याने त्यांना बोनस मिळून एकूण विमा संरक्षण 7 लाख 75 हजार रुपयांचे होते.
दरम्यान, अर्जदार यांच्या पत्नीला 2020 मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. पुढे पोटात तीव्र वेदना व अन्न न जात असल्याने गरुड हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते. पुण्याहून आलेल्या डॉक्टरांनी कावीळ व लिव्हरमध्ये कर्करोग पसरल्याचे निदान केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी 9 ऑगस्ट 2024 रोजी पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
तत्काळ कॅशलेस सुविधा मिळावी म्हणून इन्शुरन्स कंपनीला कळवूनही, कंपनीने डॉक्टरांना चौकशीसाठी वेळ नाही असे सांगून विनाकारण क्लेम फेटाळला. दुर्दैवाने 12 ऑगस्ट 2024 रोजी उपचार चालू असतानाच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर अर्जदाराने उपचारासाठी केलेल्या 3,77,921 रुपयांच्या खर्चाचे बिल सादर करत विमा दावा केला. परंतु कंपनीने दीर्घकाळ कोणतीही चौकशी केली नाही.
शेवटी 23 जानेवारी 2025 रोजी ॲड. देवा थोरवे व ॲड. सुनिल मुंदडा यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस पाठविल्यानंतर कंपनीने तातडीने 3 लाख 30 हजार रुपये खात्यात जमा केले. मात्र बाकी रक्कम व व्याज मिळावे यासाठी अर्जदाराने ग्राहक तक्रार निवारण आयोगात दावा दाखल केला असून, हा खटला ॲड. देवा थोरवे, ॲड. सुनिल मुंदडा व ॲड. सुभाष वाघ यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.