अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेची मागणी
एजंट व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितसंबधातून सर्वसामान्यांची लूट होत असल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने भिंगार तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही (व्हॉइस रेकॉर्डिंगसह) कॅमेरे आणि दरपत्रक फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर कार्यालयात भ्रष्टाचार वाढला असून, नागरिकांची लूट थांबविण्यासाठी तातडीने सदरची उपाय योजना करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
संघटनेच्या शिष्टमंडळाने मंडळ अधिकारी वैशाली दळवी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, जिल्हा उपसचिव पवन सेवक, आकाश ठाकूर, आरपीआयचे भिंगार शहराध्यक्ष मंगेश मोकळ, दिलीप सूर्यवंशी, गोविंद घोडके, विकास पंडित, महर्षी वाल्मिकी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष केशर नकवाल, उपाध्यक्ष कविता नकवाल, हेमा उदासी, भावना बैद, मंजु बैद, अनिता कुडिया, पूजा चंदेले, पूजा नकवाल, करिश्मा संगेलिया, पुनम सेवक, सुनिता बैद, रिना सारवान आदींसह नागरिक उपस्थित होते.
तलाठी कार्यालयातील दररोजच्या कामकाजावर कॅमेऱ्यांची निगराणी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या या कार्यालयात उत्पन्न दाखला, जागेच्या नोंदी आणि इतर कागदपत्रांसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले जात आहेत. परंतु, येथे दरपत्रक सुद्धा लावलेले नाही, ज्यामुळे भ्रष्टाचार वाढला आहे आणि नागरिकांची लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संघटनेचे म्हणणे आहे की, तलाठी कार्यालयात बाहेरचे एजंट लोक कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामे करून घेत आहेत, ज्यामुळे सामान्य जनतेची पिळवणूक केली जात आहे. अन्य शासकीय कार्यालयांमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावले आहेत, परंतु भिंगार तलाठी कार्यालयात अद्याप अशी व्यवस्था नाही. संघटनेने प्रशासनाला निवेदन देत, सी.सी.टी.व्ही (व्हॉइस रेकॉर्डिंगसह) कॅमेरे आणि दरपत्रक फलक लवकर लावण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.