वकिलांचे शिष्टमंडळ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती यांची घेणार भेट
भारतीय संविधानातील कलम 51 अ खालील मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील अनेक वकिलांनी देश स्वतंत्र होण्यासाठी लढा दिला. तर स्वातंत्र्योत्तराच्या 77 व्या वर्षात भारतीय संविधानातील कलम 51 अ खालील मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी होण्यासाठी मूलभूत कर्तव्य प्रबोधन चळवळ उभारण्यास जिल्ह्यातील वकिलांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी वकिलांचे शिष्टमंडळ नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती यांची भेट घेणार असल्याची माहिती ॲड. अशोक कोठारी, ॲड. नरेश गुगळे व ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
अहमदनगर जिल्हा न्यायालयाला 200 वर्षे झाली, त्याचे औचित्य साधून ॲड. अशोक कोठारी, ॲड. विश्वासराव आठरे, ॲड. नरेश गुगळे, ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. किशोर देशपांडे, ॲड. रमेश कराळे, ॲड. सुभाष काकडे, ॲड. लक्ष्मण कचरे, ॲड. संतोष वाळूंज, ॲड. कारभारी गवळी इत्यादींनी मूलभूत कर्तव्य प्रबोधन चळवळ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांनी सुद्धा या कामी संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका दर्शवली आहे.
भारतीय संविधानातील कलम 51 अ खालील मूलभूत कर्तव्यांची लीगल सर्विस ॲथोरॅटीस ॲक्ट 1987 खालील देशपातळीवरील, राज्यपातळीवरील व जिल्हा पातळीवरील प्राधिकरणांचा या कामी सहभाग असावा अशी भूमिका सदर वकिलांनी मांडलेली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न फार व्यापक झाला आहे. मानव जातीसह सर्व सजीव सृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे देशभरात संविधानाने जाहीर केलेल्या मूलभूत कर्तव्यांचा वापर करून व्यापक प्रबोधन चळवळ सुरू करण्यात येत आहे. येत्या महिनाभरात भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांना शिर्डी येथे मूलभूत कर्तव्या बाबतचे व्यापक चर्चा संवाद आयोजित करण्यात येणार असल्याचे वकिलांच्या वतीने ॲड. अशोक कोठारी यांनी म्हंटले आहे. शिर्डी येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी शिर्डी संस्थानच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका अहमदनगरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा स्पष्ट केले असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हटले आहे.
शिर्डी येथे सर्व जात, पंथ व धर्माचे लोक भारतासह परदेशातूनही भाविक साईबाबांच्या दर्शनाला येतात. साईबाबांनी सर्व सजीव सृष्टी जगविण्यासाठी श्रद्धा व सबुरीचा संदेश दिलेला आहे. शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये जागतिक वृक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. पृथ्वी ही सर्व सजीवांची आई आहे आणि सर्व सजीव सृष्टीला अभय देण्याची व मानव जातीला जगण्यासाठी सुजलाम सुफलाम करण्याची गरज आहे. त्याचा भाग म्हणून पृथ्वी मातेला भारताचे सरन्यायधीशांच्या हस्ते जिवंत स्वरूपातील रक्षाबंधन करण्यात येणार आहे. सर्व न्यायाधीशांनी, वकिलांनी शिर्डीच्या पवित्र भूमीत हे वृक्षाबंधन तमाम देशाच्या साक्षीने करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.
मूलभूत कर्तव्यांबाबत तमाम लोकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील वकिलांच्या पुढाकाराने व देशभरातील वकीलांच्या सहभागातून जागतिक वृक्षाबंधन कार्यक्रम व्यापक करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न सोडवण्याची संधी तमाम लोकांना मिळणार आहे. देशभरातील किमान 1 हजारापेक्षा जास्त विधी सेवा प्राधिकरणांचा यामध्ये सहभाग मिळावा, असा प्रयत्न वकिलांच्या पुढाकाराने सुरू आहे. देशभरातील न्यायाधीशांचा देखील मूलभूत कर्तव्य प्रबोधनासाठी सहभाग व्हावा यासाठी सुद्धा भारताच्या सरन्यायाधीशांकडे आग्रही भूमिका या चळवळीच्या माध्यमातून मांडली जाणार आहे.