पै. नाना डोंगरे यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान; विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने ग्रामस्थांची जिंकली मने
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच उज्वलाताई कापसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, नवनाथ विद्यालयात संस्थेच्या सचिव सुमन कुरेल व शहिद जवान स्मारक येथे मेजर सहदेव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायतच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच किरण जाधव, माजी सरपंच साहेबराव बोडखे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद जाधव, दिपक गायकवाड, संजय कापसे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, गोकुळ जाधव, बाबूराव जाधव, गोरख फलके, सोसायटीचे व्हाईस चेअरमन जालिंदर आतकर, अतुल फलके, मयुर काळे, संदिप गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच उज्वलाताई कापसे म्हणाल्या की, गावातील क्रीडा क्षेत्राताला चालना देण्याचे काम पै. नाना डोंगरे यांनी केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू पुढे आले असून, ते सातत्याने क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना चालना देत आहे. त्यांच्या या कार्यास ग्रामपंचायतचे देखील सहकार्य राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. राजेंद्र शिंदे यांनी सामाजिक, कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात पै. नाना डोंगरे यांचे सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले.
गावात विद्यार्थ्यांनी हातात तिरगे झेंडे घेवून भारत माता की जय घोषात प्रभातफेरी काढली होती. शाळेत विद्यार्थ्यांनी सादर केलेले बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम व चित्तथरारक कवायतीच्या प्रात्यक्षिकांनी ग्रामस्थांची मने जिंकली. यावेळी लेझीम पथक व देशभक्तीच्या गीतांचे बहारदार सादरीकरण झाले.
