• Wed. Oct 29th, 2025

अपहरण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर वाढीव कलम लावा

ByMirror

May 5, 2024

भाळवणी येथे मारहाण झालेल्या धोत्रे यांच्या पत्नीची मागणी; पोलीस अधीक्षकांची घेतली भेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- अपहरण करुन जबरदस्तीने भाळवणी (ता. पारनेर) येथे बाबू धोत्रे यांना हातपाय बांधून लाकडी दांडक्याने व फायटरने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपींवर वाढीव कलम लावून कारवाई करण्याची मागणी धोत्रे यांच्या पत्नी शोभा धोत्रे व धोत्रे कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


पाडळी येथील गावाच्या जत्रेला जाणाऱ्या बाबू धोत्रे यांच्याशी गोड बोलून आरोपीच्या हॉटेल मधील वेटरने भाळवणी येथे सोडण्यास सांगितले व नंतर पुन्हा तो त्यांना नगर शहरातील रेल्वे स्टेशनला घेऊन आला. मित्राला भेटून येण्याचे सांगून तो वेटर धोत्रे यांची मोटारसायकल घेऊन पसार झाला. धोत्रे भाळवणी जवळ आले असता, चारचाकीत आलेल्या धोंडीभाऊ सुंबे, अक्षय सिनारे, अजय सिनारे, रामदास बाबर व इतर दोन इसम (सर्व रा. पारनेर) यांनी धोत्रे यांना मारहाण करुन त्यांचे हातपाय बांधून जबरदस्तीने गाडीत बसवले व काही अंतरावर समाधान हॉटेल येथे घेऊन हॉटेल बाहेरच त्यांना लाथाबुक्क्या, लाकडी दांडके व फायटरने मारहाण करण्यात आली. गंभीर मारहाणीत ते बेशुद्ध झालेले धोत्रे यांना धोंडीभाऊ शिंदे जीवे मारुन टाकण्याचे सांगत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


बाबू धोत्रे यांना उपचारासाठी खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. ते या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या बरगड्या फॅक्चर होवून फुफ्साला जखमा झाल्या आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असताना पारनेर पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी यांनी हॉस्पिटलला येऊन जबाब घेतला. पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

परंतु पतीने सांगितल्याप्रमाणे जबाब घेण्यात आलेला नसल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
या प्रकरणात संगणमत करून, अपहरण करून व हातपाय बांधून आणि बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असताना आरोपींवर वाढीव कलम लावून कारवाई करण्याची मागणी शोभा धोत्रे व धोत्रे कुटुंबीयांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *