महिला-युवतींसह युवकांचा सहभाग
पारंपारिक व्यवसायांना मिळणार आधुनिक प्रशिक्षणाची जोड व आर्थिक सहाय्य
अहमदनगर (प्रतिनिधी)- बारा बलुतेदार व त्यासंबंधी काम करणाऱ्या लहान मोठे कारागीर आणि व्यावसायिकांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन शहरातील जन शिक्षण संस्थेत करण्यात आले. तसेच यावेळी स्वच्छता अभियान पंधरवड्याचा शुभारंभ करुन सार्वजनिक स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
या अभियानाचे उद्घाटन भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या हस्ते झाले. यावेळी विश्वकर्माचे डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट मॅनेजर मनीषा गालफाडे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे कौशल्य अभियान अधिकारी संकेत पगारे, जन शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, कुंदा शिंदे, लेखापाल अनिल तांदळे आदींसह लाभार्थी महिला व युवक उपस्थित होते.

प्रास्ताविकात बाळासाहेब पवार म्हणाले की, आजही समाजात बारा बलुतेदारांचे पारंपारिक पध्दतीने काम सुरु आहे. त्याकामाला अद्यावत तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यामध्ये नाविन्य आणून पारंपारिक व्यावसायिकांना सक्षमपणे उभे करण्याच्या दृष्टीकोनाने राबविण्यात आलेली विश्वकर्मा योजना दिशादर्शक आहे. यामुळे पारंपारिक व्यवसायाला चालना मिळून सशक्त भारत घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संकेत पगारे यांनी विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींची नोंदणी, यामध्ये 18 प्रकारच्या ट्रेडचा असलेला समावेश, पाच दिवस ट्रेनिंग व सहाव्या दिवशी परीक्षा घेतली जात असल्याची माहिती दिली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या लाभार्थींना पाच टक्के दराने नॅशनल बँकेतून कर्ज, पाचशे रुपये दिवसाप्रमाणे 3000 रुपयांपर्यंतचे स्टायपेंड व 15 हजार रुपयांचे टूल्स किट देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
भानुदास बेरड म्हणाले की, कोणत्याही जातीचे व्यक्ती स्वत:मध्ये असलेल्या कौशल्यावर आधारीत या योजनेचा लाभ घेऊ शकतो. जातीविरहित ही योजना राबविण्यात आली आहे. गोरगरिबांच्या हाताला काम व कौशल्य निर्माण करण्याचे काम या योजनेद्वारे होणार आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांवर भाजप कार्य करत असून, शेवटच्या रांगेतील शेवटच्या माणसापर्यंत सत्तेचा लाभ मिळावा या दृष्टिकोनाने कार्य सुरू आहे. प्राचीन काळातील आर्किटेक्ट असलेले विश्वकर्मा यांनी द्वारकानगरी उभारली त्यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थ्यांनी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून या योजनेचा लाभ घ्यावा व प्रचार प्रसार करुन गरजूंपर्यंत ही योजना पोहोचवण्याचे त्यांनी आवाहन केले.
जन शिक्षण संस्थेत विश्वकर्मा योजनेतंर्गत सलून सेवा बेसिक ट्रेनिग या ट्रेडसाठी सहा दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. या योजनेसाठी 45 लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. तर संस्थेच्या वतीने स्वच्छता अभियान पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला असून, 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच सर्व लाभार्थींना एक पेड मा के नाम! संकल्पनेने एक झाड लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा शिंदे यांनी केले. आभार शफाकत सय्यद यांनी मानले.
