• Wed. Oct 15th, 2025

शहरातील जलाल शहा बुखारी कब्रस्तान मध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ

ByMirror

Jul 1, 2024

आमदार जगताप यांच्या प्रयत्नाने भाविकांसाठी हॉल (भटारखाना) ची व्यवस्था

विधानसभेच्या तोंडावर जत्रेचे पुढारी आले -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणूक आली म्हणून विकास कामे नसून, शहराच्या विकास कामात सातत्यता आहे. विधानसभेच्या तोंडावर जत्रेचे पुढारी आले असून, ते फक्त निवडणुकीच्या जत्रे पुरतेच मर्यादीत राहणार आहे. शहरात व उपनगरात लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना असा कोणताही परिसर शिल्लक राहिला नाही, की जेथे विकास काम झाला नाही. सर्वच ठिकाणी विकासकामातून कायापालट झाला आहे. आजपर्यंत मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानासाठी इतिहासात एवढा मोठा निधी कोणत्याही लोकप्रतिनिधीने दिलेला नाही. आपल्या मतांची ताकत विकासासाठी उभी करण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


शहरातील हजरत सय्यद जलाल शहा बुखारी कब्रस्तान मध्ये हॉल बांधणे (भटारखाना) व पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते झाला. जलाल शहा कब्रस्तान मध्ये येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्र अल्पसंख्याक विभाग मार्फत अल्पसंख्यांक बहुल नागरिक क्षेत्र विकास निधीतून सदर विकास काम मार्गी लावण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी समाज कल्याण अधिकारी रफीक मुन्शी, ॲड. फारूक बिलाल, नगरसेवक समद खान, मुजाहिद (भा कुरैशी), राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, सामाजिक कार्यकर्ते खान बाबा, आरिफ शेख, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख, उद्योजक वाहिद हंडेकरी, विश्‍व मानवाधिकारचे प्रदेशाध्यक्ष नवेद शेख, फारूक नालबंद, पै. यासर शेख, आरपीआयचे (गवई) शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, शाहनवाज शेख, तनवीर पठाण, शहबाज बॉक्सर, अब्दुल खोकर, आदिल शेख, इमरान शेख, सोहेल खान, सोहेल जहागीरदार, बरकत चुडीवाला, राजीक शेख, अकरम शेख आदींसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे आमदार जगताप म्हणाले की, सरकारमध्ये सत्तेत आल्यानंतर सर्व कब्रस्तानच्या विश्‍वस्तांची बैठक घेऊन, कब्रस्तानचे विविध विकास कामे फेब्रुवारी महिन्यातच मंजूर करून आणले. 38 ते 39 हजार पथदिवे बसवून शहरातील अंधकार दूर करण्यात आला. यापूर्वी कधी एवढे दिवे लागले नाही, त्याचे नियोजन करुन पथदिवे बसविण्यात आले. मात्र ज्या विरोधकांचे जीवनच झिरो झाले आहे, त्यांना हे दिवे झिरो बल्ब दिसत आहे. कोट्यावधीचा निधी रस्त्यांच्या कामासाठी आणला. शहर व उपनगरातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर निवडणूक आल्यावर पुढेपुढे करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना कोरोनाच्या संकट काळात कुठे होता? हे प्रश्‍न विचारण्याची गरज आहे. निवडणूक आल्यामुळे ते सर्वांकडे जात असल्याचा आरोप केला.


पक्षाचे व राजकीय गणित सोडून विकास काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर विश्‍वास टाकून जबाबदारी सोपवा. बाकीचे पाहू नका. टोकाची भूमिका असलेले पक्ष राजकीय सत्तेसाठी एकत्र आले, उद्या राजकारणात काय घडणार? हे कोणी सांगू शकत नाही. विकासासाठी सर्वांनी एकजुटीने मागे उभे राहण्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.


प्रारंभी आमदार जगताप यांनी हजरत सय्यद जलाल शहा बुखारी यांच्या दर्गात चादर अर्पण करुन दर्शन घेतले. प्रास्ताविकात साहेबान जहागीरदार म्हणाले की, जलाल शहा हे अन्यायाविरुद्ध लढताना शहीद झालेले संत आहे. प्लेग महामारीत रंगरेज परिवाराने जागा विकत घेऊन येथे दफनविधीसाठी जागा उपलब्ध केली. शंभर वर्षानंतर कोरोना काळातही हे कब्रस्तान पुन्हा उपयोगी आले. आमदार संग्राम जगताप दोनदा महापौर असताना येथील मोठ्या प्रमाणात विकास कामे त्यांनी मार्गी लावली व आमदार असताना देखील योगदान देत आहेत. मुस्लिम समाजाच्या सर्व कब्रस्तानसाठी सर्वात मोठा निधी देणारे ते एकमेव लोकप्रतिनिधी आहे. काहींनी हसन शहा कादरी येथील कब्रस्तान येथे चालू होणाऱ्या कामाच्या रस्त्यापुढे स्टंटबाजी केली. मात्र त्यांना एमएसईबीच्या विद्युत प्रवाह असलेल्या विविध केबल्सच्या शिफ्टिंगसाठी काम थांबविले असल्याचे माहित नाही. नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम विरोधक करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी मोहरमनिमित्त बारा इमाम कोठला येथील रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी आमदार जगताप यांच्याकडे करण्यात आली.


रफीक मुन्शी यांनी मुस्लिम समाजातील शिक्षणासाठी देखील विशेष लक्ष देण्याची गरज असून, युवकांचे ड्रॉप आउटचे प्रमाण वाढत आहे. अल्पसंख्यांकांच्या शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले. तर गट-तट व पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन सर्वांच्या विकास कामासाठी धावून येणारे आमदार जगताप हे एकमेव लोकप्रतिनिधी असल्याचे स्पष्ट केले. ॲड. फारूक बिलाल यांनी कब्रस्तानचे विविध प्रश्‍न आमदार जगताप यांच्यामुळे मार्गी लागल्याचे सांगितले. दानिश शेख यांनी शहर विकासाला चालना देऊन आमदार जगताप यांनी अल्पसंख्यांक बहुल भागात विकास कामे मार्गे लावली. सर्व कब्रस्तानसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. भविष्यात त्यांच्या मागे समाज देखील उभा राहणार असल्याचे सांगितले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय साबळे यांनी केले. आभार सुफियान शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फताह मस्जिद ट्रस्ट जलाल शहा, सर्जेपुरा यंग पार्टी, जलाल शाह यंग पार्टी, लालटाकी यंग पार्टी, रामवाडी यंग पार्टी, सर्जेपुरा सोशल क्लब, हयात युनिटी फाउंडेशन, दोस्ती यंग पार्टी, संजेरी फाउंडेशन, ईदगाह मैदान यंग पार्टी, बेलदार गल्ली यंग पार्टी, बारा इमाम कोठला यंग पार्टी, मस्तान शाह यंग पार्टी, हवेली यंग पार्टीच्या सर्व युवकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *