चारचाकी वाहनांसाठी एकाच ठिकाणी सुविधा
युवकांनी स्वतःचे कौशल्य ओळखून व्यवसायाकडे वळावे -आ. संग्राम जगताप
नगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-कल्याण रोडवरील जाधव पेट्रोल पंप शेजारी ओम साई उद्योग समूहाच्या सहाव्या शाखेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. या केंद्रामध्ये चारचाकी वाहनांची अद्यावत पध्दतीने सर्व्हिसिंग, डेंटिंग, पेंटिंग, मेकॅनिकल व वायरिंग या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्यासाठी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती गणेश कवडे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी नगरसेवक संजय शेंडगे, श्याम नलकांडे, सचिन शिंदे, ॲड. युवराज शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, संचालक ऋषिकेश भापकर, शुभम पाटील भापकर, काका शेळके, अशोक घोडके, पै. महेश लोंढे, सुनील कदम, प्राचार्य लालचंद हराळ, शिक्षणाधिकारी रामदास हराळ, उद्योजक जयवंत जाधव, पारुनाथ ढोकळे, भगवान काटे, सरपंच संतोष भापकर, संजय कोतकर, सुनील भापकर आदींसह भापकर परिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, आजच्या काळात युवकांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता, स्वतःचे कौशल्य ओळखून व्यवसायाकडे वळावे. ओम साई उद्योग समूहासारख्या नव्या व्यवसायिक संकल्पना युवकांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. अशा माध्यमातून केवळ रोजगार नव्हे, तर इतरांनाही रोजगार उपलब्ध होतो, ही बाब अधिक महत्वाची आहे. नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन स्वतःचे व्यवसाय उभे करावे. सरकारकडूनही युवा उद्योजकांसाठी विविध योजना आहेत, त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
संचालक ऋषिकेश भापकर म्हणाले की, उत्तम दर्जाच्या चारचाकी वाहन दुरुस्ती, विशेषतः पेंटिंग, वायरिंग यासाठी नागरिकांना मोठ्या शहरांत जावे लागत होते. ही गैरसोय लक्षात घेऊनच ओम साई उद्योग समूहाच्या माध्यमातून अद्ययावत सुविधा असलेले केंद्र नगरमध्ये सुरु करण्यात आलेले आहे. यासाठी अनुभवी आणि कुशल कारागीर असून, आधुनिक मशिनरी व जागतिक दर्जाच्या सेवा येथे दिल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.