• Wed. Oct 15th, 2025

शासकीय तंत्रनिकेतन, अहिल्यानगरमध्ये अत्याधुनिक सीईटी संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन

ByMirror

Apr 26, 2025

ज्या क्षेत्रात जाता, त्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट द्या -गणेश भोसले

प्राचार्य डॉ. अजय आगरकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचा सर्वांगीण विकास; नामांकित कंपन्यामध्ये 315 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट

नगर (प्रतिनिधी)- शासकीय तंत्रनिकेतन अहिल्यानगर या संस्थेत अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त सीईटी संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या हस्ते झाले. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉ. अजय म. आगरकर, श्री. उपकरणीकरण विभागप्रमुख बाळासाहेब कर्डिले, संगणक विभागप्रमुख सुधीर मुळे, अनुविद्युत विभागप्रमुख ज्ञानेश्‍वर अहिरराव, विद्युत विभागप्रमुख डॉ. बाबासाहेब खरबस, प्रबंधक मनोहर चौधरी, प्रयोगशाळेचे समन्वयक संजय हरिप यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.


गणेश भोसले म्हणाले की, ज्या क्षेत्रात जाता, त्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट द्या. अद्ययावत प्रयोगशाळेचा पूर्ण क्षमतेने वापर करून आपले भविष्य उज्वल करण्याची ही एक संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. या महाविद्यालयात आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून अद्यावत ग्रंथालय उभे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्राचार्य डॉ. अजय आगरकर यांचे अभिनंदन केले. पदविका तंत्रशिक्षणात अव्वल असलेल्या या संस्थेने पुढाकार घेऊन शहरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करून शासनास सादर करावे. ते मंजूरीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. यामुळे गोर-गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सोय जिल्ह्यातच शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


अशोक कडूस म्हणाले की, शासकीय तंत्रनिकेतन ही संस्था तंत्रशिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करीत असून, या लॅबच्या उपलब्धतेमुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, असे गौरवोद्गार काढले. तसेच या संस्थेने या वर्षी 315 विद्यार्थ्यांना नामांकित औद्यागिक कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळवून दिले. अद्ययावत प्रयोगशाळा आणि संस्थेत उपलब्ध इतर संसाधनांचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपले उज्जवल भविष्य घडविण्याचे त्यांनी आवाहन केले. तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीकोनाने विविध उपक्रम राबविणारे प्राचार्य डॉ.अजय आगरकर आणि अधिकाऱ्यांचे कौतुक केले.


दोन हजार चौरस फुटामध्ये शंभर संगणकांचा समावेश असलेली वातानुकूलित सीईटी संगणक प्रयोगशाळा आहे. यामध्ये 100 आय सेव्हन संगणक असून, सीईटी परीक्षेसाठी आवश्‍यक सर्व यंत्रणा आहेत. सर्व्हर रूम, यूपीएस प्रणाली, विद्युत जनरेटर आदी सुविधा आहेत. प्रामुख्याने याचा उपयोग सीईटी परीक्षेस बसणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता वापरण्यात येणार असून, यासाठी एकूण सव्वा कोटी रुपये खर्च आला आहे. सदर खर्च सीईटी सेल, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्यातर्फे करण्यात आला आहे. ही यंत्रणा उभी करणारी कंपनी तीन वर्ष पूर्ण देखभाल करणार असल्याची माहिती प्रयोगशाळेचे समन्वयक संजय हरिप यांनी दिली.


प्राचार्य डॉ. अजय म. आगरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेतील विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाचा आढावा घेतला. ऑक्टोबर 2024 मध्ये रुजू झाल्यानंतर केवळ सहा महिन्यांत त्यांनी अनेक विद्यार्थीभिमुख प्रकल्प आणि विकास योजना राबवल्या. सात कोटी रुपयांच्या फेस लिफ्टिंग योजनेतर्गत 65% कामे पूर्ण झाली असून, उन्हाळी 2025 पासून ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी स्कॅनिंग सेंटर कार्यान्वित होणार आहे.


संस्थेला इन्क्यूबेशन हब सेंटर म्हणून मान्यता मिळाली असून, राज्यातील निवडक 12 तंत्रशिक्षण संस्थांमध्ये संस्थेचा समावेश झाला आहे. वनविभागाच्या सहकार्याने दोन मियावाकी घन जंगलांची संकल्पना राबविण्यात येणार आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 मध्ये दोन राज्यस्तरीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये पेपर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट, पोस्टर सादरीकरण पाच ठिकाणी प्रथम व द्वितीय पारितोषिक मिळवले. तांत्रिक क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रातही संस्थेचा उत्तम सहभाग राहिला. राज्यस्तरीय बॅडमिंटन, खो-खो, बुद्धिबळ आणि व्हॉलीबॉल या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी विजेते व उपविजेतेपद मिळवले. इलेक्ट्रॉनिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी एमएसबीटीई आणि जीएमआरटीच्या प्रोजेक्ट स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले. तसेच नांदेड येथे व उत्पादन अभियांत्रिकी विभागाच्या आयोजनात प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दादासाहेब करंजुले यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले.

नामांकित कंपन्यामध्ये 315 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट
टाटा मोटर्स, कमिन्स इंडिया, आय एफ बी, बजाज ऑटो, जी. ई. एविएशन आणि सेनवियन विंड टेक्नॉलॉजी या नामांकित कंपन्या मध्ये डिसेंबर 2024 ते एप्रिल 2025 या काळात अनुक्रमे 101, 40, 14,67,20 आणि 19 विद्यार्थी यासह एकूण 315 तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले. तसेच उन्नती फाउंडेशन (इन्फोसिस) च्या माध्यमातून एकूण 100 विद्यार्थ्यांना एक महिन्याचे सॉफ्ट स्किल प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *