झोपडपट्टी मधील विद्यार्थ्यांना मिळणार अद्यावत शिक्षणासह संस्कार व आरोग्याची शिदोरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील झोपडपट्टी भागात शिक्षण, संस्कार व आरोग्याच्या शिदोरीने दुर्बल घटकातील मुलांच्या जीवनात प्रकाश वाट निर्माण करणाऱ्या स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनचे आठवे केंद्र कोठला घासगल्ली येथे कार्यान्वीत करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त या उत्कर्ष बालभवनचे उद्घाटन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख व सामाजिक कार्यकर्ते वाहीद हुंडेकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी बालभवनच्या मानद संचालिका वैशाली चोपडा, अनिवासी प्रकल्पाचे संचालक हनीफ शेख, स्नेहालयाचे विश्वस्त राजीव गुजर, पालक प्रतिनिधी संजय बंदिष्टी, तौसीफ कुरेशी आदींसह सर्व केंद्र समन्वयक, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात वैशाली चोपडा यांनी विकसित भारत निर्माण करण्यासाठी शिक्षणाचा पाया भक्कम असणे आवश्यक आहे. यासाठी स्नेहालय बालभवन प्रकल्प रात्र अभ्यासिकेतून अनेक शैक्षणिक मागास विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवित आहे. दुर्लक्षीत घटकांना चांगल्या शिक्षणाची संधी निर्माण करुन त्यांना एक उत्तम नागरिक म्हणून घडवित असल्याचे स्पष्ट केले. प्रारंभी बालभवनच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित बालकांनी हम सब बच्चे देश की ताकत…, हम सब बच्चे देश की दौलत… च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सुनिता औटी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन स्वागत केले.

मन्सूर शेख व वाहीद हुंडेकरी यांनी उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या बालभवनच्या सर्व उपक्रमांना नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे आश्वासन दिले. संजय बंदिष्टी यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आल्याने दुर्लक्षित घटकांच्या आयुष्याची दिशा बदलणार आहे. बालभवन प्रकल्पातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाचा उत्कर्ष साधला असल्याचे सांगितले.
राजीव गुजर म्हणाले की, शिक्षणातून जीवनाच्या प्रकाशवाटा निर्माण होतात. यासाठी सर्व घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची गरज आहे. चांगले आदर्श व ध्येय समोर ठेऊन जीवनाची वाटचाल करण्याचे त्यांनी आवाहन केले. हनीफ शेख म्हणाले की, शहरात मागील 22 वर्षापासून स्नेहालय संचलित बालभवन सेवा वसाहतीमध्ये योगदान देत आहेत. मुठभरांची वाढती श्रीमंती व कोट्यावधीचे दारिद्य या विषमतेने देश भविष्यात महासत्ता होणार की झोपडपट्टयांचा देश बनणार? हा गंभीर प्रश्न आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग असून, झोपडपट्टीमध्ये जाऊन त्यांना शिक्षण व विकासाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य बालभवन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा साळवे यांनी केले. आभार रुबिना शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उषा खोल्लम, निलोफर शेख, संतोष बेदरकर, रुबिना शेख, सुनिता औटी, शाहिद शेख आदींनी परिश्रम घेतले.
झोपडपट्टी भागातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना अद्यावत व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी स्नेहालय संचलित बालभवन कार्य करत आहे. शहरात विविध झोपडपट्टी भागात बालभवनचे 7 केंद्र चालत असून, यामाध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडविण्यात आले आहे. हजारो विद्यार्थी या शिक्षणाच्या प्रवाहात आले असून, त्यांना संध्याकाळी या प्रकल्पातून शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचे काम सुरु आहे. तर त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी व्यक्तीमत्व विकास व आरोग्याकडे देखील विशेष लक्ष दिले जात आहे. कोठला घासगल्ली येथे नव्याने सुरु झालेल्या प्रकल्पात 200 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.