• Wed. Jul 23rd, 2025

महिलांसाठी सहा दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन

ByMirror

Mar 4, 2024

आयुर्वेदच्या माध्यमातून महिलांचे विविध आजार दूर करण्याचा विश्‍वमंगल आयुर्वेद केंद्राचा उपक्रम

निरोगी समाज घडविण्यासाठी महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक -किशोर डागवाले

अहमदनगर (प्रतिनिधी)- आयुर्वेदच्या माध्यमातून महिलांच्या विविध समस्या व आजार दूर करण्याच्या उद्देशाने महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर चौपाटी कारंजा येथील विश्‍वमंगल आयुर्वेद चिकित्सा केंद्राच्या वतीने सहा दिवसीय महिलांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. या शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. किशोर डागवले म्हणाले की, सर्व आजारांवर अतिशय परिणामकारक सिद्ध होत असलेल्या आयुर्वेदचा अवलंब होण्याची गरज आहे. महिलांच्या आरोग्य प्रश्‍न आयुर्वेदच्या माध्यमातून दूर करण्यासाठी घेण्यात आलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. निरोगी समाज घडविण्यासाठी महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. योग्य व्यायाम, योग व आहारकडे लक्ष दिल्यास जीवन निरोगी होणार आहे. शिववरद प्रतिष्ठान व विश्‍वमंगलच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्यावर संयुक्तपणे उपक्रम घेण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला.


डॉ. स्नेहलकुमार रहाणे म्हणाले की, महिला कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. मात्र महिलांनी वेळोवेळी तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. 8 मार्च दुपारी 3 ते 5 या वेळात महिलांची मोफत तपासणी सुरू राहणार असून, याचा महिलांनी लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले. डॉ. श्रुती रहाणे यांनी सध्या महिलां मध्ये पाळीच्या तक्रारी, थायरॉइड, पीसीओडी, वजन वाढणे अशा अनेक तक्रारी वाढत चाललेल्या असून सदर शिबिराच्या माध्यमातून महिलांमध्ये आरोग्याबाबत जागृती केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या शिबिराच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक राहुल सरोदे, किरण लोंढे राहुल पठारे, रश्‍मी पिंगळे, शोभा लोंढे, संजय जाधव, कविता नकवाल, प्रीती गायकवाड, आरती पायाळे, मनीषा बोरगे, अनिता देशपांडे आदी कार्यरत आहेत. या शिबिरासाठी नावनोंदणी आवश्‍यक असून, तपासणीला येण्यापूर्वी 9220900900 या नंबरवर संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *