रोटरी प्रियदर्शिनी, प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपचा संयुक्त उपक्रम
शारीरिक व मानसिक स्वास्थासाठी, नैसर्गिक चिकित्सा पद्धतीचे मोलाचे योगदान -अलकाताई मुंदडा
नगर (प्रतिनिधी)- शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी, प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने शहरात सहा दिवसीय ॲक्युप्रेशर व्हायब्रेशन आणि सुजोक चिकित्सा शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील ख्रिस्त गल्ली येथे घेण्यात आलेल्या शिबिरास महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी रोटरी प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा मीनल बोरा, गीता गिल्डा, प्रतिभा धूत, प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, विद्या बडवे, सुरेखा भोसले, हिरा शहापुरे, मिनल गंधे, रेखा फिरोदिया, ज्योती गांधी, मनीषा देवकर, मधु अग्रवाल, आरती लोहाडे, देविका रेळे, रजनी भंडारी, ईश्वर बोरा, सुरेखा जंगम, अरुणा गोयल, श्रद्धा उपाध्ये, जयश्री पुरोहित, लीला अग्रवाल, मीरा पोफलिया, प्रतिभा गांधी, शीतल तिवारी, अर्चना मुथा आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गीता गिल्डा म्हणाल्या की, आरोग्याप्रति प्रत्येकाने जागरूक राहिले पाहिजे. स्वतःच्या आरोग्यासाठी अर्धा एक तास व्यायामाला देण्याची गरज आहे. धकाधकीच्या जीवनात आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, गंभीर आजार टाळण्यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कुटुंबाची आणि बाहेरची जबाबदारी सांभाळताना आरोग्याकडे दुर्लक्ष होते, यासाठी ॲक्युप्रेशर अत्यंत प्रभावी उपचार पध्दती असल्याचे त्यांनी सांगितले.
अलकाताई मुंदडा यांनी मानवी जीवनात शारीरिक व मानसिक स्वास्थासाठी, नैसर्गिक चिकित्सा पद्धतीचे योगदान मोलाचे आहे. यासाठी ॲक्युप्रेशर व्हायब्रेशन आणि सुजोक पध्दती उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. विद्या बडवे म्हणाल्या की, ॲक्युप्रेशर थेरपी ही नैसर्गिक चिकित्सा पद्धत आहे. आपल्या हातापायातील ॲक्युप्रेशर पॉईंट विशिष्ट पद्धतीने दाबल्यास शरीरातील आजार हळूहळू नैसर्गिकरित्या विना औषध बरे होतात. रक्ताभिसरण व रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी ॲक्युप्रेशर शिबीर लाभदायक असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग ट्रीटमेंट संस्था जोधपुर (राजस्थान) यांच्या माध्यमातून सदर शिबिर घेण्यात आलेले आहे. टी.आर. चौधरी व राजेंद्र सारंग ॲक्युप्रेशर पध्दतीचे उपचार देत आहेत. विना औषध आणि दुष्परिणाम नसलेले ॲक्युप्रेशरचे उपचार दिले जात असून, यामध्ये डोकेदुखी, लठ्ठपणा, गुडघेदुखी, मधुमेह, उच्च रक्तदाब, ॲसिडिटी, कंबरदुखी, मानसिक तणाव, हातापायाला मुंग्या येणे आदी आजाराने ग्रस्त अलेले नागरिक उपचार घेण्यास येत आहे. सहा दिवस हे शिबिर सकाळी व संध्याकाळी दोन सत्रात सुरु असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.