विविध चित्र व हस्तकलेतून विद्यार्थ्यांनी दाखवली कौशल्याची चुणूक
पालकांनी आपल्या मुलांची आवड ओळखून त्या दिशेने प्रोत्साहन द्यावे -संदेश विसपुते
नगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कल्पकतेला वाव देण्यासाठी कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कला प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार व कलाशिक्षक संदेश विसपुते यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेच्या प्राचार्या योगिता आठरे यांच्यासह सर्व शालेय शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी कुंचल्यातून कागदावर रेखाटलेल्या चित्र हुबेहूब जिवंत केले, तसेच विविध वास्तूंचे मॉडेल तयार करण्यात आले होते. या प्रदर्शनास शिक्षक व पालकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. कला प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने स्मरण चित्र (मेमरी ड्रॉईंग), वस्तू चित्र (स्टील लाईफ), संकल्प चित्र (डिझाईन), भौमितिक आकार, दिया पेंटिंग, मार्बल पेंटिंग, स्प्रे पेंटिंग, मधुबनी पेंटिंग, वारली पेंटिंग, टी-शर्ट पेंटिंग, स्टोन आर्ट, ग्लास पेंटिंग, गोंड आर्ट, क्ले वर्क, क्राफ्ट वर्क, हँगिंग वर्क, राखी आर्ट यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनासाठी भरपूर मेहनत घेऊन अध्यापक व पालकांच्या मार्गदर्शनाखाली कलाकृती व प्रकल्प सादर केले. प्राचार्या योगिता आठरे यांच्या संकल्पनेतून कलाशिक्षक हरेश्वर साळवे यांच्या पुढाकाराने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी लिपन आर्ट, टेराकोटा आर्ट, प्रिंट आर्ट (मुद्रा चित्र/ठसा चित्र), दोरा चित्र (गुंडाळी चित्र), पॉट पेंटिंग, स्प्रेड पेंटिंग (फुंकर चित्र), मुक्तहस्त चित्र (फ्रीहँड ड्रॉईंग), पोस्टर पेंटिंग, मंडला आर्ट, अक्षर लेखनातून आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली.
संदेश विसपुते यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर कलेचे देखील धडे देण्याची गरज आहे. कला क्षेत्रातही करियरच्या अनेक संधी निर्माण झाल्या असून, पालकांनी आपल्या मुलांची आवड ओळखून त्या दिशेने त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
या कला प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. महानंद माने, खजिनदार महेश घाडगे, संस्थेचे पदाधिकारी तसेच सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहीरे, सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.