• Tue. Oct 14th, 2025

अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांच्या संयुक्त खेळ मेळाव्याचे उद्घाटन

ByMirror

Nov 30, 2024

इतिहास पराभवाची पण नोंद घेतो, फक्त संघर्षात दम असला पाहिजे -राकेश ओला (जिल्हा पोलीस अधीक्षक)

नगर (प्रतिनिधी)- खेळाकडे फक्त स्पर्धा व मनोरंजन म्हणून पाहू नका, खेळातून यशस्वी नागरिक घडण्याची पायाभरणी होत असते. शाळा म्हणजे फक्त अभ्यासाचे केंद्र नसून, मुलांमध्ये सर्व गुणांचा पाया रुजवणारे मंदिर आहे.खेळात जय-पराजय हा अविभाज्य भाग आहे. इतिहास पराभवाची पण नोंद घेत असतो, पण त्यासाठी संघर्षात दम असावा लागतो, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांच्या संयुक्त खेळ मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ओला बोलत होते. याप्रसंगी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, विश्‍वस्त मंडळाचे सदस्य ॲड. गौरव मिरीकर, सल्लागार मंडळाचे सदस्य भूषण भंडारी, सुनीता मुथा, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, रुपीबाई बोरा हायस्कूलचे मुख्याध्यापक अजय बारगळ, अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य संदीप उबाळे, नवीन मराठी शाळा विश्रामबागच्या मुख्याध्यापिका वनिता गोत्राळ, किशोर संस्कृत प्रशाला मुख्याध्यापिका उज्वला कळमकर आदींसह सर्व शालेय शिक्षक, क्रीडा शिक्षक, खेळाडू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे ओला म्हणाले की, अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमधून फक्त शिक्षण दिले जात नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातात हे कौतुकास्पद आहे. हा समारंभ पाहून माझ्या शालेय जीवनाची आठवण झाली. खेळ हा माझ्या आवडीचा तास होता. कठोर परिश्रम, चिकाटी, सहकार्य वृत्ती, यश-अपयश पचविण्याची मानसिकता अशा गुणांची जोपासना खेळामुळे होत असते. यातूनच यशस्वी नागरिक तयार होत जातात. खेळाकडे करिअर म्हणून पहा. खेळातून नोकरीच्या संधी देखील उपलब्ध असून, शासकीय नोकरीमध्ये देखील खेळाडूंना आरक्षण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्रास्ताविकात छायाताई फिरोदिया यांनी शाळेत गुणवत्तेबरोबर क्रीडा क्षेत्राला देखील प्रोत्साहन देऊन उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे कार्य सुरु आहे. क्रीडा क्षेत्रातही शाळेने आघाडी घेतलेली असून, अनेक खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकले आहे. बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास साधण्याचे काम शाळेत केले जात असल्याचे सांगितले.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ज्योतचे स्वागत करुन ध्वज फडकावून व आकाशात फुगे सोडून खेळ मेळाव्याचे उद्घाटन पार पडले. बॅण्ड पथकाच्या निनादात संस्थेच्या भाऊसाहेब फिरोदिया, रुपीबाई बोरा न्यू इंग्लिश स्कूल, अशोकभाऊ फिरोदिया, नवीन मराठी शाळा विश्रामबाग, सोसायटी प्राध्यापक विद्यालय, किशोर संस्कृत संवर्धिनी प्रशाला मधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे संचलन करुन पाहुण्यांना सलामी दिली. राज्य कबड्डी खेळाडू साक्षी दिंडे हिने विद्यार्थ्यांना खेळाची शपथ दिली.


या कार्यक्रमात संस्थेच्या विविध शाळांमधील राष्ट्रीय व राज्य पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक उल्हास दुगड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विविध शाळांमधील खेळाचा अहवाल मुख्याध्यापक प्रभाकर भाबड यांनी सादर केला. संचलन आदेश अरविंद आचार्य यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गुगळे व अमेय कानडे यांनी केले. आभार मुख्याध्यापक अजय बारगळ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *