विविध उपक्रमांमध्ये सहभाग यशाचा मंत्र -सागर कोरडे
नगर (प्रतिनिधी)- सध्या सर्धेचे युग असून, पुस्तकी ज्ञानाबरोबर इतर उपक्रमांमध्ये सहभाग युवकांना यशाचा मंत्र बनला आहे. सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्राबरोबर विभिन्न क्षेत्रात करिअरच्या वाटा निर्माण झाल्या आहेत. युवकांनी या संधीचे सोने करावे, असे प्रतिपादन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सागर कोरडे यांनी व्यक्त केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र यांच्यामार्फत सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयाच्या सहकार्याने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन केले. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कोरडे बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार संजय शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक संकल्प शुक्ला, सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, सावेडी मसापचे अध्यक्ष जयंत येलूलकर आदी उपस्थित होते.

यंदा जिल्हास्तरीय युवा महोत्सव विज्ञान व तंत्रज्ञानामधील नवसंकल्पना विषयावर आधारित आहे. या युवा महोत्सवात समूह लोकनृत्य, लोकगीत, कथालेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. युवक-युवतींनी दुपारच्या सत्रात समूह लोकनृत्य व लोकगीतांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
पुढे कोरडे म्हणाले की, पुस्तकी ज्ञान यश मिळवून देईल ही शाश्वती देता येत नाही, परंतु युवकांनी अभ्यासेत्तर उपक्रमांत सहभागी होऊन प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळेल असे त्यांनी सांगितले. तर जिल्ह्यातील युवकांनी राष्ट्रीय युवा महोत्सावात जिल्ह्याचे नाव उंचावण्याचे आवाहन केले.

नेहरू युवा केंद्र समन्वयक संकल्प शुक्ला म्हणाले की, तैयारी ही जित है!.. सामाजिक, सांस्कृतीक व क्रीडा क्षेत्रात युवकांना संधी निर्माण झाली आहे. स्पर्धेचे युग असल्याने युवकांनी सामाजिक, सांस्कृतीक क्षेत्रातून आपल्या कलागुणांना वाव देऊन या क्षेत्राकडेही करिअरची संधी म्हणून पहावे. आपल्यातील क्षमता ओळखण्यासाठी प्रत्येकाने स्पर्धेत उतरण्याची गरज आहे. नेहरू युवा केंद्राकडून युवकांना प्रोत्साहान दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जयंत येलूलकर म्हणाले, तरुण सक्षम असेल तर कोणाताही देश सक्षम असतो. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून देशातील युवकांसाठी चांगले उपक्रम राबविले आहेत. आजच्या कार्यक्रमाने जिल्ह्यातील युवकांना व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.
क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे यांनी प्रास्ताविकात म्हणाले की, जिल्हा युवा महोत्सवातून प्रथम, द्वितीय येणाऱ्या युवकांची विभागीय महोत्सावासाठी निवड होणार असून, यातील विजेत्यांची राज्यस्तरीय महोत्सवासाठी निवड होईल. यानंतर 11 व 12 जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड होणार आहे. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी भाऊसाहेब वीर, प्रियंका खिंडरे, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, रमेश जगताप, सीएसआरडीचे डॉ. सुरेश मुगुटमल, डॉ. प्रदीप झरे, डॉ. विजय संसारे, डॉ. जेमूल वर्गीस, आलावरी झापके आदी अपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सॅम्युअल वाघमारे यांनी केले.
