स्त्री शिक्षणाने समाजात क्रांती झाली -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आलेल्या मुलींनी मुलगी वाचवा… मुलगी शिकवाचा संदेश दिला.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, मंदा साळवे, अमोल वाबळे, तृप्ती वाघमारे, प्रमोद थिटे, भानुदास लंगोटे, तेजस केदारी, ग्रंथपाल बाळासाहेब कोतकर, संदीप डोंगरे, प्रशांत जाधव, लहानु जाधव आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, आजच्या पिढीला सावित्रीबाई फुले यांचे कार्य व विचार समजण्याची गरज आहे. स्त्री शिक्षणाने आज समाजात क्रांती झाली आहे. स्त्री शिक्षणाची मशाल प्रज्वलीत करणाऱ्या सावित्रीबाईंचे कार्य आजही दीपस्तंभासारखे आहे. प्रवाहा विरोधात जाऊन त्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य केले. आजची कर्तृत्ववान स्त्रीचे श्रेय सावित्रीबाईंना जात असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तम कांडेकर म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे महिलांना शिक्षण, समानता आणि स्वातंत्र्याचा मार्ग मिळाला. समाजाच्या शिव्याशापाला दुर्लक्ष करून सावित्रीबाईंनी महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ज्योतीरावानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीची जबाबदारी स्वतः समर्थपणे पेलवली. समाजातील जातीय भेदभाव विरोध करून स्त्रीभ्रूण हत्याविरुद्धही त्या कार्यरत होत्या. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी समाजसेवा केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील कार्यावर उजाळा टाकला.