विद्यार्थ्यांना सावली मिळण्याच्या उद्देशाने बाबासाहेब बोडखे यांचा वृक्षारोपणाचा उपक्रम; शाळेत लावली 41 झाडे
सामाजिक बांधिलकी असलेल्या शिक्षकांची समाजाला गरज -अशोक कडूस
नगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला येथील हिंदी माध्यमच्या पंडित नेहरू हिंदी विद्यालय परिसर हिरवाईने फुलविण्याचा ध्यास घेतलेले शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी स्वखर्चाने वृक्षारोपण अभियान राबविले. नचिकेत बोडखे या दिव्यांग असलेल्या आपल्या मुलाला शाळेत शिक्षण देता येत नसल्याने, त्याच्या नावाने शाळेत झाडे लावून शाळेत येत असलेल्या इतर मुलांना सावली मिळण्याच्या उद्देशाने बोडखे सातत्याने हा उपक्रम राबवित आहे. शाळेत त्यांनी नुकतेच आपल्या दिव्यांग मुलाच्या नावाने 41 झाडे लावली.

शाळेत राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण अभियानाचे प्रारंभ माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या हस्ते झाडाची लागवड करुन करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण, संस्थेचे सचिव किशोर मुनोत, मुख्याध्यापक सुहास धिवर आदींसह सर्व शालेय शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
अशोक कडूस म्हणाले की, दिव्यांग, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी बाबासाहेब बोडखे यांनी सुरु केलेला उपक्रम समाजाला दिशादर्शक आहे. बोडखे यांना आपल्या दिव्यांग मुलाला शाळेत पाठवता येत नसल्याने ते दरवर्षी त्याच्या वाढदिवसाला गरजू व दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध प्रकारची मदत देत असतात. इतर मुलांमध्ये ते आपले मुले पाहतात. सामाजिक बांधिलकी असलेल्या शिक्षकांची समाजाला गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब बुगे म्हणाले की, बोडखे यांचे सामाजिक कार्य फक्त वैचारिक नव्हे, तर कृतीतून उतरलेले आहे. त्यांच्या योगदानाने अनेक विद्यार्थ्यांना आधार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. जुबेर पठाण यांनी समाजाशी नाळ जोडलेला शिक्षक म्हणून बोडखे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी शाळेत चालवलेली वृक्षारोपणाची मोहिम दिशादर्शक ठरणार असल्याचे स्पष्ट केले. किशोर मुनोत यांनी बोडखे यांचे कार्य सर्वांसाठी स्फूर्तीदायी आहे. आपल्या मुलाच्या नावाने एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करणारे बोडखे यांच्या कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची एकप्रकारे आवड निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंडित नेहरू हिंदी विद्यालय परिसरात बोडखे यांनी मागील 3 वर्षात 41 झाडे लावून ती जगवली आहे. या झाडांमुळे शालेय परिसर हिरवाईने फुलत असून, यामध्ये वड, पिंपळ, बकुल, मोहगणी, कांचन, रंगीत बोगनवेल, कडूलिंब आदी झाडांचा समावेश आहे.