• Tue. Mar 10th, 2026

शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना होण्याचा धोका

ByMirror

Dec 23, 2024

बाबासाहेबांच्या पुतळ्या भोवती बॅरीकेट लावण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

परभणी सारखी गंभीर परिस्थिती शहरात उद्भवू नये -योगेश साठे

नगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळून अवजड वाहन गेल्याने लावण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक खचले असून, एखाद्या वाहनाचा धक्का लागून बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये महापालिका प्रशासनाने बाबासाहेबांच्या पुतळ्या शेजारी बॅरीकेट लावण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.


मार्केटयार्ड चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम सुरु असताना जुना अर्धाकृती पुतळ्या त्याच जागेवर असून, त्या भोवताली असलेला संरक्षक भिंती व कठडे हटविण्यात आले आहे. तर पुतळ्या शेजारी पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले आहे. मात्र त्या पेव्हिंग ब्लॉकच्या रस्त्यावरुन रात्री वाहने जात असल्याने लावण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक देखील खचले आहे. या पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पुतळा परिसराची पहाणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश साठे, सल्लागार जे.डी. शिरसाठ, शहर महासचिव अमर निरभवणे, नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे, संजय शिंदे, जीवन कांबळे, प्रमोद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.


जिल्हाध्यक्ष योगेश साठे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या भोवती बॅरीकेट नसल्याने एखादे वाहन पुतळ्यास धडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुतळ्या शेजारुन वाहने जात असून, सुदैवाने वाहनांचा धक्का अद्यापि पुतळ्यास लागलेला नाही. तर काही समाजकंटक देखील ही दुर्घटना जाणीवपूर्वक करण्याच्या तयारीत असतील. परभणी येथे नुकतेच बाबासाहेबांच्या पुतळ्या जवळील संविधानाची तोडफोड करुन विटंबना झाली आहे. अशी गंभीर परिस्थिती शहरात उद्भवू नये म्हणून महापालिका प्रशासनाने तात्काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या भोवती बॅरीकेट लावण्याची मागणी त्यांनी केली. तातडीने महापालिका प्रशासनाने सदर प्रश्‍नी दखल घ्यावी अन्यथा बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *