पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक छळ झाल्याचा आरोप
मुलांचा वयोगट, बुद्धीगुणांक व परीक्षेसाठी निर्धारित वेळेला तिलांजली देवून काढला पेपर
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत इंग्रजी, बुद्धिमत्ता या पेपर क्रमांक दोन मधील प्रश्नांची काठिण्य पातळी विद्यार्थी वयोगटापेक्षा कमालीची ठेवून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या सर्व जबाबदारी अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, अन्यथा 12 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या पालकांसह उपोषण करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत इंग्रजी, बुद्धिमत्ता या पेपर क्रमांक दोन मधील प्रश्नांची काठीण्य पातळी विद्यार्थी वयोगटापेक्षा कमालींची असल्याने विद्यार्थी गोंधळून गेले. मुलांना दिलेल्या वेळेत पेपर सोडवणे कठीण झाले होते. वर्षभराची तयारी करुन देखील अधिकाऱ्यांच्या चूकीमुळे विद्यार्थ्यांच्या हाती निराशा आली आहे. इंग्रजी, बुद्धिमत्ता विषयाची प्रश्नपत्रिका तयार करताना निश्चित केलेल्या अभ्यासक्रमाचा सोयीस्कररित्या विसर पडलेला आहे. मुलांचा वयोगट, बुद्धीगुणांक व परीक्षेसाठी निर्धारित वेळ यांचा विचार करून प्रश्नपत्रिका काढणे अपेक्षित असते. मात्र या सर्व बाबींना तिलांजली देण्यात आली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कर्तव्यात कसूर करणे व हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक छळ झाला आहे. यापूर्वी फक्त शुद्धलेखनाच्या चुका असायच्या, मात्र यावर्षीची प्रश्नपत्रिका पूर्णत: पाठ्यक्रम व अभ्यासक्रमा बाहेरील असल्याने परीक्षा परिषदेला नेमके काय साध्य करायचे आहे? हा संशोधनाचा विषय बनला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
विद्यार्थ्यांच्या मानसिक व बौद्धिक भावनांशी खेळण्याचा परिषदेला कोणताही अधिकार नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया पालकांमध्ये उमटत असून, परीक्षा परिषदने ही चूक मान्य करून, ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना त्या प्रश्नाचे गुण देण्यात यावे व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार असणाऱ्या अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
