17 महिन्यांपासून अंतिम आदेश प्रलंबित; कर्मचाऱ्यांच्या देणग्यांचे निवारण करण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर तालुका सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघ मर्यादित या संस्थेच्या अवसायन प्रक्रियेला 17 महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी उलटूनही अंतिम आदेश न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वतीने विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक येथील कार्यालया समोर साखळी आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. तर सर्वप्रथम कर्मचाऱ्यांच्या देणग्यांचे निवारण करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
गुरुवारी (दि.1 मे) महाराष्ट्र दिनापासून तायगा शिंदे व गजानन खरपुडे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या उपोषणात कुंडलिक देवकर, दत्तात्रय बेकारसे, अशोक डहाने, आप्पासाहेब ढवळे, अशोक धनगर, बाबजी शिंदे, भाऊसाहेब पळसकर, रमेश वायकर, बाबासाहेब चतुर, संभाजी निमसे, कोंडीभाऊ शेळके, बाळासाहेब थोरात, सुनिल निमसे, बाळासाहेब बेरड सहभागी झाले होते.
8 नोव्हेंबर 2023 रोजी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक विभाग यांनी संघाला अवसायनात घेतल्याचे अंतरिम आदेश काढले होते. मात्र, कायद्यानुसार एक महिन्याच्या आत अंतिम आदेश अपेक्षित असतानाही आजतागायत तो आदेश न झाल्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये असंतोष पसरला आहे. सदर निर्णयात माजी संचालक मंडळाने संघाचे आर्थिक नुकसान केल्याचे पुरावे असूनही त्यांच्यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. उलट, त्यांच्या पाठीशी राजकीय पाठबळ असल्याचा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, सध्याचे प्रभारी कार्यकारी संचालक माजी संचालक मंडळाच्या संपर्कात राहून कारवाईस विलंब लावत आहेत. देणी आणि प्रॉव्हिडंट फंड मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कार्यालयाकडून देण्यात येत नाहीत. एवढेच नव्हे, तर कार्यालयाकडून योग्य माहिती देण्यासही टाळाटाळ होत आहे.
प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळत नसून, ही बाब अन्यायकारक आहे. न्यायालय किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाकडून स्थगिती आदेश नसताना, अवसायनाचे अंतिम आदेश प्रलंबित ठेवणे हा राजकीय हस्तक्षेप असल्याचा ठपका कर्मचाऱ्यांनी ठेवला आहे. यामुळे संघातील कर्मचाऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हंटले आहे.