गावच्या विकासासाठी सरपंच व सदस्यांचे योगदान कौतुकास्पद -भानुदास कोतकर
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या वतीने सत्कार समारंभात गौरव करण्यात आला. तर ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांची नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
केडगाव येथील कोतकर फार्म हाऊस येथे सत्कार समारंभ सोहळ्याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच उज्वला कापसे, माजी सरपंच लताबाई फलके, उपसरपंच किरण जाधव, उद्योजक दिलावर शेख, ग्रामपंचायत सदस्य संजय कापसे, प्रमोद जाधव, दीपक गायकवाड, रूपाली जाधव, दादा गायकवाड, अजय ठाणगे, एकनाथ जाधव, बापू फलके, ऋषी जाधव, गणेश सातपुते, कुमार होळकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
भानुदास कोतकर म्हणाले की, ग्रामपंचायत ही लोकशाहीची पहिली पायरी आहे. गावाचा सर्वांगीण विकास हे ग्रामपंचायतीचे मुख्य उद्दिष्ट असते. आज आपल्यासमोर उभे असलेले हे सर्व सदस्य गावच्या विकासासाठी योगदान देत असल्याचे त्यांनी कौतुक केले. उज्वला कापसे यांच्यासारख्या महिलांना नेतृत्वाची संधी मिळणे ही गावाला विकासात्मक दिशा दाखवते. तसेच नाना डोंगरे यांनी खेळाच्या माध्यमातून तालुक्यात योगदान दिले आहे. त्यांच्या फेरनिवडीने क्रीडा क्षेत्राला नवा उत्साह देणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
पै. नाना डोंगरे यांनी भानुदास कोतकर यांच्या राजकारण व समाजकारण मधील जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर केडगावच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान स्पष्ट केले.