64 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात पटकाविले द्वितीय क्रमांक
गायकवाड याने राज्यात गावाचे नाव उंचावले -अतुल फलके
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील महेश विजय गायकवाड याने नागपूर येथे झालेल्या 64 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (विद्यार्थी विभाग) 2024-25 स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. त्याचा गावात एकता फाऊंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.
एकता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सोसायटी सदस्य अतुल फलके यांनी महेश गायकवाड याचा सत्कार केला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक छगन कापसे, डॉ. विजय जाधव, जालिंदर आतकर, पिंटू जाधव, गोरख शिंदे, गणेश गायकवाड, अनिल डोंगरे, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.
अतुल फलके म्हणाले की, महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावून महेश गायकवाड याने गावाचे नाव उंचावले आहे. राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविणे हा गावासह जिल्ह्यासाठी भूषण आहे. त्यांच्या भविष्यातील कार्यासाठी एकता फाऊंडेशन नेहमीच त्याच्या पाठिशी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना महेश गायकवाड याने कुटुंबीयांची साथ व ग्रामस्थांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे राज्यात नाव गाजविता आले. जीवनात मोठे होताना गावातच संस्कार व सर्वांगीन विकासाचा पाया रचला गेला. यामुळे हे ध्येय साध्य करता आले. गावात होत असलेला सन्मान हा पुरस्कार सारखाच असल्याचे त्याने स्पष्ट केले.