• Wed. Oct 15th, 2025

शहरात येणारी अवजड वाहने विद्यार्थ्यांसह नागरीकांच्या उठल्या जीवावर

ByMirror

Dec 28, 2024

दिवसा शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घाला

सर्वसामान्य नागरिकांमधून मागणी

नगर (प्रतिनिधी)- वाहतुक कोंडी, अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या शहरात घुसणारी अवजड वाहतुक त्वरीत थांबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. नियमांचे उल्लंघन करुन सर्रासपणे दिवसाढवळ्या व प्रतिबंध असलेल्या वेळेत शहरातून मोठ्याप्रमाणात अवजड वाहतुक विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जीवावर उठली आहे. या अवजड वाहनांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असून, काही महिन्यांपूर्वी बालिकाश्रम रोड, सर्वोदय कॉलनी येथे शालेय विद्यार्थ्याचा अवजड वाहनामुळे दुर्दैवी अपघाती निधन झाला होता. मात्र अद्यापि प्रशासनाने ही अवजड वाहतुक बंद केलेली नसल्याने नागरिकांमधून संतप्त भावना उमटत आहे.


शहरात अनेक ठिकाणी अंतर्गत रस्त्यांचे कामे सुरु असल्याने नागरिकांना दळणवळणासाठी मुख्य रस्त्यांचा आधार घ्यावा लागत आहे. शहरात सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान अवजड वाहनांना शहरात येण्यास बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ शहरातून सुरु आहे. अनेक ठिकाणी मुख्य चौकात अवजड वाहनांमुळे वाहतुक कोंडीचा त्रास देखील नागरिकांना सहन करावा लागत आहे. शाळा भरताना व सुटताना तसेच इतर कार्यालयीन वेळेत शहरात वाहतुकीचे नियोजन नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. अवजड वाहन शहरात येत असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरुन मार्गक्रमण करावे लागत आहे.


शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असताना, अवजड वाहने रस्त्यावर येत आहेत. या वाहतूक कोंडीमुळे व अवजड वाहनांच्या घुसखोरीमुळे अनेक अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे. अवजड वाहनांना शहरात दिवसा येण्यास बंदी केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होवून वाहतुक कोंडीचा प्रश्‍न देखील सुटण्यास मदत होणार आहे. शहर वाहतुक पोलीसांनी तातडीने दखल घेऊन शहरात दाखल होणारे अवजड वाहने रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या, आनखी काही जणांचा बळी जाण्याची वाट न पाहता तातडीने शहरातील अवजड वाहतुक बंद होण्यासाठी अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *