आदिवासी सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम
आदिवासी ग्रामस्थांवर मोफत औषधोपचार करुन केल्या विविध आरोग्य तपासण्या
नगर (प्रतिनिधी)- सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्यातील अतिदुर्गम आदीवासी भागात मोफत आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने आदिवासी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचा उपक्रम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठानच्या माध्यमातून रतनवाडी (ता. अकोले) येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास ग्रामस्थांसह आदीवासी समाजबांधवांचा उत्स्फोर्त प्रतिसाद लाभला. प्रतिष्ठानचे अकोले तालुक्यातील हे दुसरे शिबिर होते.
रतनवाडीच्या सरपंच धनश्री संदीप झडे व उपसरपंच भरत झडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गणेश झडे, दशरथ झडे, हरी झडे, भारत झडे, प्रतिष्ठानचे सचिव महेश शेळके, उपाध्यक्ष नितीन साबळे, आदिनाथ भांगरे, रवी कोतवाल, ऋषिकेश उघडे, विशाल भारमल आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महेश शेळके म्हणाले की, गोरगरीब अतिदुर्गम भागातील आदीवासी समाजबांधवां पर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हा एकमेव आदिवासी सेवा प्रतिष्ठानचा उद्देश आहे. प्रतिष्ठानकडे आरोग्य शिबिर घेण्याची अनेक गावातील सरपंचांनी मागणी केली असून, टप्प्याटप्प्याने गावे घेऊन मागणीनुसार गावामध्ये रुग्णसेवा पोहोचविण्याचे काम प्रतिष्ठान करणार आहे. या आरोग्यसेवेच्या उपक्रमास ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरपंच धनश्री झडे म्हणाल्या की, प्रतिष्ठानचे निस्वार्थ सामाजिक कार्य आदीवासी भागात कमी वेळात खूप लोकप्रिय झाले असून, त्यांच्या या कार्याला रतनवाडी ग्रामपंचायतचे नेहमी सहकार्य राहणार असल्याचे स्पष्ट केले. या शिबिरासाठी रखमाजी मुठे, शरद कोरडे, दामू शेळके, निवृत्ती भांगरे, सुरेश शेंगाळ, जयराम कोकतरे, एकनाथ घोडे, काशीनाथ गवारी, नवनाथ बांबेरे, संतोष नवले, हनुमंत सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
आदीवासी भागातील ग्रामस्थांना खर्चिक आरोग्य सुविधा परवडत नसल्याने पारंपारिक पध्दतीने ते औषधोपचार करतात. मात्र गंभीर आजार टाळण्यासाठी वेळोवेळी उपचार व तपासण्यांची गरज आहे. ही जाणीव ठेवून सदर शिबिर राबविण्यात आले होते. यामध्ये तज्ञ डॉक्टरांनी आदिवासी ग्रामस्थांची विविध आरोग्य तपासणी करुन गरजूंना मोफत औषधे दिली. तर निरोगी आरोग्याबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.