• Thu. Oct 16th, 2025

नेप्तीत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिलांची आरोग्य तपासणी

ByMirror

Sep 20, 2025

महिला व किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथे स्वस्थ नारी, सशक्त परिवार या अभियानांतर्गत महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. यामध्ये महिला-युवती, किशोरवयीन मुली तसेच गरोदर व स्तनदा माता व इतर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.


या शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्या सोनाली बंडू जपकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच संजय जपकर, ग्रामपंचायत सदस्य बंडू जपकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, अमोल चौगुले, उमेश होळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुवर्णा राऊत, आरोग्य सेविका अश्‍विनी झावरे, आरोग्य सेवक चंचल बग्गन, आशा सेविका मनीषा जपकर, निर्मला जपकर, छाया भुजबळ, सीमा काळभोर, डाटा ऑपरेटर अंकिता जपकर, ग्रामस्थ सुभद्रा गुंजाळ, रशिदा शेख, ताराबाई शिंदे, ताराबाई पुंड, नंदा होळकर आदींसह परिसरातील महिला व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.


17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत घेतलेल्या या शिबिरात उच्च रक्तदाब, मधुमेह, स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर), क्षयरोग (टी.बी.) तपासणी तसेच हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर महिलांना डोळ्यांची तपासणी, स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व, संतुलित व सकस आहार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांच्या तणावमुक्त जीवनासाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी योगाचे धडे देण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.


सोनाली जपकर म्हणाल्या की, स्त्री ही कुटुंबाचा कणा असते. ती निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहते. आजच्या आधुनिक जीवनशैलीत महिलांना विविध आजार जडतात. रक्तक्षय, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार वेळेत ओळखले गेले नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम होतात. अशा शिबिरांमुळे महिलांना वेळेत निदान व योग्य उपचार मिळतात, ही महत्त्वाची बाब आहे. मुलींच्या किशोरवयात आरोग्य व स्वच्छतेबाबत योग्य मार्गदर्शन करणे अत्यावश्‍यक आहे. तसेच गरोदर आणि बाळांतीण मातांची तपासणी झाल्यामुळे मातामृत्यू व बालमृत्यू दर कमी करण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या शिबिराचा पंचक्रोशीतील महिलांनी लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *