आजारी असताना नव्हे, तर नियमितपणे आरोग्य तपासणी गरजेची -संध्या पावसे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव देवी रोड येथील एकता कॉलनीमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालय व कल्पद्रुम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरास परिसरातील ग्रामस्थ, विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरामध्ये महिलांसाठी स्वतंत्र तपासणीची व्यवस्था करण्यात आली होती. रक्तदाब, हिमोग्लोबिन, मधुमेह, हाडांची तपासणी यांसह विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. याचा लाभ मोठ्या संख्येने महिलांनी घेतला. शिबिरात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
या शिबिराप्रसंगी मंगल पाटील, भारती चोरबेले, स्वाती महामुनी, संध्या पावसे, ॲड. महेश शिंदे, चंद्रकांत पाटोळे, रामेश्वर राऊत, विनायक पावसे, दत्तात्रय खैरे, जयश्री पाटील, कांता कल्हापुरे, विद्या कुलकर्णी, प्रमिला खेतमाळस, साधना मुळे, संजीवनी शिंदे, मंजुषा शिंदे, पूजा जाधव, कल्पना दुशिंग, छबुबाई भापकर, रेखा पंडित, आनंदी वाघावकर, सुमिद्रा पाटोळे, ॲड. आरती शिंदे आदी उपस्थित होत्या.
संध्या पावसे म्हणाल्या की, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत महिला घर, संसार, नोकरी, मुलं अशा जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आरोग्य तपासणी ही फक्त आजारी असताना नव्हे तर नियमितपणे केली पाहिजे. कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. महिला हीच कुटुंबाची आधारस्तंभ असते. आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी अशा सर्व भूमिका निभावताना तिचे आरोग्य सक्षम राहिले तरच संपूर्ण कुटुंब निरोगी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिराद्वारे महिलांना सदृढ आरोग्यासाठी आहार, व्यायाम आणि दिनचर्या यावर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंढावळे, ॲड. महेश शिंदे, चंद्रकांत पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले.