आरोग्य शिबिराला महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती -ज्ञानेश्वर खुरंगे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सुदृढ निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती असून, नित्यनियमाने मैदानी खेळ, व्यायाम, योगा केल्यास आनंददायी जीवन जगता येते. सर्वांनी शरीरसंपदेकडे लक्ष देणे गरजेचे असून, सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले.
मुंबादेवी प्रतिष्ठान, जीवन आधार प्रतिष्ठान, जिल्हा रुग्णालय, महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय केडगाव आदींच्या सहयोगाने केडगाव येथे नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी खुरंगे बोलत होते.
जीवन आधार प्रतिष्ठानचे ॲड. पुष्पा जेजुरकर म्हणाल्या की, महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. टीव्हीवर मालिका व मोबाईलवर रिल्स पाहण्यापेक्षा दररोज व्यायामाला वेळ दिल्यास सदृढ आरोग्य मिळणार आहे. योग्य आहार घेतल्यास शारीरिक तंदुरुस्ती ठेवता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबू काकडे म्हणाले की, वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवून सर्वांच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, ऋतूप्रमाणे फळे, जेवणाच्यावेळी मोड आलेली कडधान्य आदींचा आहारात समावेश करून आरोग्याला जपण्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरास राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंढावळे, जय असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, प्राचार्य संदीप भोर, चंद्रकांत पाटोळे, संध्या पावसे, उडाणच्या अध्यक्षा आरती शिंदे, माहेरच्या रजनीताई ताठे, प्रगती फाउंडेशनच्या अश्विनी वाघ, ॲड. विद्या शिंदे, निलेश मेढे, तुषार रणनवरे, भाऊसाहेब पादिर, आनंद वाघ, समृद्धी महिला संस्थेच्या स्वाती डोमकावळे, प्रकाश डोमकावळे, समर्पण संस्थेच्या कांचन लद्दे, मंगलाताई पाटील, समिद्रा पाटोळे आदी उपस्थित होते.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, गीत गायनातून आरोग्य प्रबोधन करण्यात आले. यामध्ये शाहीर वसंत डंबाळे, शाहीर कान्हू सुंबे, नृत्य विशारद अनंत द्रविड यांचा समावेश होता. महेश शिंदे यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
जिल्हा रुग्णालयाचे डॉ. मनीषा सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मिरीकर, नेत्रचिकित्सक अधिकारी डॉ. मिनल झावरे, डॉ. मयुरी गवई, डॉ. संतोष गिऱ्हे आदींनी सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी, देविदर्शनासाठी येणारे भाविक, केडगाव व नगर शहरातील स्त्री-पुरुषांची तपासणी करून औषधोपचार केले. या शिबिराला केडगाव परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चंद्रकांत पाटोळे यांनी आभार मानले.