हनुमान चालीसा पठन, भजन संध्येने भाविक मंत्रमुग्ध
नगर (प्रतिनिधी)- राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवनसुत नामा! अशा हनुमान चालीसा पठनाने व विविध भाव-भक्ती गीतांनी रेल्वे स्टेशन रोड येथील आनंदनगर परिसर दुमदुमला. या धार्मिक सोहळ्यासाठी परिसरातील नागरिकांसह महिला व अबालवृध्दांची मोठी गर्दी होती. या धार्मिक सोहळ्यात साक्षात हनुमानजीच्या वेशभूषेत अवतरलेल्या हनुमानजींनी भाविक व बालगोपाळांसह भक्ती गीतांवर ठेका धरला होता.
गणेश लालबागे व विशाल भगत मित्र परिवाराच्या वतीने हनुमान चालीसा पाठन व भजन संध्येचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संतोष मेहेर, साहिल कटारिया, संदीप गुजर, संजय पुरुषोत्तमवार, रुपेश गायकवाड, लाभेश फिरोदिया, सचिन लोखंडे, दत्ता जाधव, तुषार शर्मा, नमन शहा आदी उपस्थित होते.
श्री वीर हनुमान सत्संग मंडळाच्या (मार्केटयार्ड) सदस्यांनी या भजन संध्येच्या कार्यक्रमात रंग भरला होता. संपूर्ण परिसर या सोहळ्याने भक्तीमय बनला होता. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर, या हनुमान चालीसाच्या विविध चालीतील गायनाने कार्यक्रमात भक्तीचे रंग उधळले. नागरिकांनी सामुदायिक पठणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन भक्तीगीतांवर ठेका धरला होता. हनुमान चालीसा गायन व विविध भजने, भक्ती गीतामध्ये उपस्थित भाविक तल्लिन झाले होते.
बोल सियाराम चंद्र की जय…, जय जय सिया राम…, जय जय राम जय श्रीराम… सीने मे मेरे सिताराम बसते… अशा भक्ती गीतांनी ही भजन संध्या उत्तरोत्तर रंगली. राम सियाराम, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की… या भजनानेही भाविक मंत्रमुग्ध झाले. गणेश लालबागे व विशाल भगत कुटुंबीयांच्या हस्ते आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.