मुंबईच्या पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली नियुक्तीची घोषणा
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर विविध विषयांवर चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक चळवळीत मागील 42 वर्षापासून कार्यरत असलेले हाजी शौकतभाई तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तांबोळी यांच्या नियुक्तीची घोषणा करून मुंबई येथील पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस रवींद्र पवार, महाराष्ट्र स्टेट हाउसिंग फायनान्स कार्पोरेशनचे माजी चेअरमन तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते किसनराव लोटके, व्यापार उद्योग सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अनंत गारदे, सय्यद खलील आदी उपस्थित होते.

नियुक्तीपूर्वी तांबोळी यांनी अंकुश काकडे यांच्या माध्यमातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांची भेट घेऊन राज्यातील शैक्षणिक, कृषी धोरणावर चर्चा केली. तर अल्पसंख्याक समाजाबाबतच्या प्रश्नावर विचार मांडले. तांबोळी यांनी संपूर्ण महाराष्ट्रात कार्य करण्याची तयारी दर्शविल्याने शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हाजी शौकतभाई तांबोळी मागील 42 वर्षापासून शहरातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व विविध क्षेत्रात योगदान देत आहेत.

तांबोळी हे ऑल इंडिया हज उमरा टूर्स ऑर्गनायझर असोसिएश व मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लास ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आहेत. तसेच विविध संस्थेच्या पदावर कार्यरत असून, ते सामाजिक योगदान देत आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगचे ते माजी सदस्य असून, त्यांचा अल्पसंख्यांक व ओबीसी समाजात असलेला जनसंपर्क आणि सर्व समाजासाठी तळमळीने सुरु असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रवादीच्या राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल तांबोळी सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे व आमदार रोहित पवार यांच्यासह पक्षातील राज्य पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
